Coronavirus : आणखी सहा जणांची वैद्यकीय तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:08 AM2020-03-13T11:08:38+5:302020-03-13T11:08:49+5:30
आतापर्यंत ११ लोकांची वैद्यकीय तपासणी झाली असून, ते देखील वैद्यकीय निगराणीत आहेत.
अकोला : विदेशातून अकोल्यात परतलेल्या नागरिकांची संख्या १२ वर पोहोचली असून, यातील सहा नागरिकांची गुरुवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत ११ लोकांची वैद्यकीय तपासणी झाली असून, ते देखील वैद्यकीय निगराणीत आहेत.
अकोल्यात कोरोनाचा एक संशयित रुग्ण समोर आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, अकोल्यात विदेशात कामानिमित्त गेलेले १२ प्रवासी दाखल झाले. त्यांच्यामार्फत कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देशभरात अशा प्रवासी भारतीयांवर विशेष लक्ष देऊन आहे. बुधवारी यातील एकाच कुटुंबातील चौघांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी आणखी सहा जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सर्वांची प्रकृती ठिक असली, तरी त्यांना पुढील १४ दिवस वैद्यकीय निगरानीखाली ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तपासणीसाठी नमुने पाठविले नागपूरला
आतापर्यंत ११ लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय चाचणीसाठी त्यांचे नमुने घेण्यात आले असून, ते नागपूरला पाठविण्यात आले आहेत. यातील सहा जण सुरक्षित असून, त्यांना कुठलाही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोना विषाणू नियंत्रण कक्षाची स्थापना
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात कोरोना विषाणू नियंत्रण कक्षाची गुरुवारी स्थापना करण्यात आली. यासाठी ०७२४-२४२१७१८ हा हेल्पलाइन क्रमांक आहे. विदेशातून येणाºया प्रत्येक नागरिकाने या क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
जिल्ह्यात एकूण १२ लोक विदेशातून आले असून, त्यांच्यावर विशेष लक्ष आहे. यापैकी सहा जणांची गुरुवारी तपासणी केली असून, इतर सहा लोकांचे आरोग्य चांगले आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.
विदेशातून येणाºया प्रत्येक नागरिकाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात नोंदणी करावी. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.