CoronaVirus : थुंकल्यास कारवाई; पानठेले बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:16 PM2020-03-20T14:16:22+5:302020-03-20T14:16:32+5:30
जिल्ह्यातील सर्वच पानठेले ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
अकोला : थुंकीद्वारे विषाणुंचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाईची तरतूद कायद्यात होतीच. त्याची अंमलबजावणी करावी याकडे ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रशासनाचे लक्ष वेधल होते. त्यानुसार, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास थेट कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिले. तसेच जिल्ह्यातील सर्वच पानठेले ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आगामी १५ दिवस कोरोनाचे जास्त संकट आहे. त्यामुळे सावधगिरी बागळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे; परंतु त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकल्यास त्यावर साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला.
हा आदेश शहरी भागात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात तहसीलदार व अन्य यंत्रणांना दिला. यासोबतच जिल्ह्यातील सर्वच पानठेले बंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, हा आदेश ३१ मार्चपर्यंत लागू असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी!
जिल्ह्यात सर्वत्र तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसही बंदी घातली आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५)च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्याचा इशारादेखील जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.