अकोला: सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.३७ टक्के असून, १९.०२ टक्के ऑक्सिजन खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, शासनाच्या निकषानुसार जिल्हा तिसऱ्याच टप्प्यात कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी गत आठवड्यातीलच नियम कायम राहणार आहेत. मागील आठवड्यापासून राज्य शासनाने पाच टप्प्यात विभागणी करून अनलॉकला सुरुवात केली. त्यानुसार गत आठवड्यात अकोला जिल्हा तिसऱ्या टप्प्यात गणला गेला. मागील आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.२४ टक्के, तर ऑक्सिजन खाटांवर असलेले रुग्ण ४४.६७ टक्के होते. त्या तुलनेत ४ ते १० जून या आठवड्यात जिल्ह्यात कोविडच्या स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट ७.२४ वरून घसरत ५.३७ टक्क्यांवर आला, तर केवळ १९.०२ टक्के ऑक्सिजन खाटांवरच रुग्ण उपचार घेत आहेत. आठवडाभरातील ही सुधारणा लक्षणीय असली, तरी पॉझिटिव्हिटी रेटमध्ये केवळ पॉइंट ३७ टक्क्यांमुळे जिल्ह्याची गणना तिसऱ्याच टप्प्यात केली जाणार आहे. जिल्ह्यात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यातीलच नियम कायम राहणार असल्याने १४ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतिष्ठानांसोबतच इतरही प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. तसेच वीकेंडला औषधांची प्रतिष्ठाने वगळून उर्वरित संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.
...तर जिल्हा पहिल्या टप्प्यात
सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.३७ टक्के असून, १९.०२ टक्के ऑक्सिजन खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन खाटांचा विचार केल्यास जिल्हा पहिल्या टप्प्याच्या निकषात बसतो, मात्र पॉझिटिव्हिटी रेटमध्ये पॉइंट ३७ टक्के जास्त असल्याने जिल्हा तिसऱ्या टप्प्यात कायम ठेवण्यात आला आहे. कोविडच्या परिस्थितीत अशीच सुधारणा राहिल्यास पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी होईल. ऑक्सिजन खाटांच्या बाबतीत जिल्ह्याची स्थिती आधीच चांगली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात जिल्हा थेट पहिल्या टप्प्यात स्थान मिळवू शकताे. मात्र, त्यासाठी अकोलेकरांना आणखी एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
काय सुरू राहील
अत्यावश्यक दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. त्यानंतर, घरपोच सेवा सुरू राहील.
जिम, सलून, ब्युटी पार्लर ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. एसी बंद ठेवूनच चालू राहतील.
सार्वजनिक मैदाने, आउटडोअर गेम्ससाठी दरदिवशी ५ ते ९ वाजेपर्यंत परवानगी.
खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीत दुपारी ४ वाजेपर्यंत चालू राहतील.
अंत्ययात्रेस २० जणांची उपस्थिती असेल.
ई-कॉमर्स वस्तू व सेवा - पूर्णवेळ सुरू राहतील. (कोविड नियमांचे पूर्ण पालन करून)
सांस्कृतिक कार्यक्रम केवळ ५० टक्के उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत करता येतील.
स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करता येतील.
लग्न समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत करता येईल.
सार्वजनिक प्रवास, आंतरजिल्हा प्रवास या गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
हे बंद राहील
मॉल, थिएटर्स, नाट्यगृह बंद राहतील.
वीकेंडला संपूर्ण बाजारपेठ बंद राहील.
गत आठवडाभरात जिल्ह्यात कोविडच्या परिस्थितीत चांगली सुधारणा झाल्याचे दिसून आले. मात्र, शासनाच्या निकषानुसार जिल्हा सध्यातरी तिसऱ्याच टप्प्यात कायम असल्याने तेच नियम कायम राहणार आहेत. यात आणखी सुधारणा झाल्यास पुढील आठवड्यात जिल्हा कोणत्या टप्प्यात गणला जाईल, त्यानुसार नियम शिथिल अथवा वाढविण्यात येतील.
- प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला