मनपाचा कारभार रसातळाला; नगरसेवकांसाठी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:31 PM2019-08-31T15:31:43+5:302019-08-31T15:31:56+5:30
महापौर व आयुक्तांनी उद्या शनिवार व रविवारी झोननिहाय नगरसेवक, झोन अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती आहे.
- आशिष गावंडे
अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांचे प्रशासकीय कारभारावर नियंत्रण नसल्यामुळे मनपाचा कारभार रसातळाला गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापौर विजय अग्रवाल व आयुक्तांमध्ये वारंवार प्रदीर्घ बैठका होत असल्या तरी त्यातून नगरसेवकांना भेडसावणाºया मूलभूत समस्यांवर तोडगा काढल्या जात नसल्याचे चित्र आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये आयुक्तांप्रती तीव्र नाराजीचा सूर निर्माण झाल्याचे लक्षात येताच ही नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नातून महापौर व आयुक्तांनी उद्या शनिवार व रविवारी झोननिहाय नगरसेवक, झोन अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती आहे.
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. भाजप लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यातून शहरातील रस्ते, पथदिवे आदी विकास कामे निकाली काढल्या जात असली, तरी त्यामध्ये मनपा प्रशासनाचे योगदान काय, असा सवाल उपस्थित होत आहे. मनपातील भ्रष्ट कारभाराची जाणीव असल्यामुळे की काय, भाजप लोकप्रतिनिधींनी रस्त्यांची सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण होत असताना रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविणे, विद्युत खांब, रोहित्र हटविण्याची जबाबदारी मनपाची असली तरी प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे सदर कामे ‘जैसे थे’ राहून रस्ता निर्मितीच्या कामाला खोळंबा होताना दिसत आहे. विकास कामे तर सोडाच, प्रभागांमध्ये ठिकठिकाणी घाणीचे ढीग, नादुरुस्त पथदिवे, रस्त्यांवर साचलेल्या सांडपाण्यामुळे अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असताना महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी ‘एसी’ दालनाबाहेर निघण्यास तयार नसल्याची केविलवाणी परिस्थिती भाजपच्या कालावधीत पाहावयास मिळत आहे. आयुक्त संजय कापडणीस यांचे प्रशासनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अक्षरश: चतुर्थ श्रेणी कर्मचारीसुद्धा वरिष्ठांना जुमानत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
समस्या ‘जैसे थे’, मग चर्चा कशाची?
मनपाचा प्रशासकीय कारभार पूर्णत: ढेपाळला असून, प्रभागातील समस्या निकाली निघत नसल्याची परिस्थिती आहे. नगरसेवकांसह सर्वसामान्य नागरिक मनपाच्या नावाने बोटं मोडत असताना महापौर विजय अग्रवाल व आयुक्त कापडणीस यांच्यात कोणत्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा होतात, असा सवाल सुज्ञ अकोलेकर उपस्थित करीत आहेत.
नगरसेवकांना गोंजारण्यासाठी बैठक
स्वपक्षीय नगरसेवकांमध्ये आयुक्त संजय कापडणीस यांच्याप्रती वाढत चाललेली नाराजी पाहून महापौर अग्रवाल व आयुक्तांनी समस्यांच्या निराकरणासाठी बैठकीचे आयोजन केल्याचे बोलल्या जात आहे. आगामी दिवसांत प्रशासन किती सजग होते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.
प्रभागात समस्यांचा ढीग; नगरसेवक वैतागले!
प्रभागातील समस्यांचा निपटारा करण्यासाठी मनपाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाप्रती नगरसेवकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षक, बांधकाम विभाग व नगररचना विभागातील अभियंता, मोटर वाहन विभागातील कर्मचारी समस्यांचे निराकरण न करता टाळाटाळ करीत असल्याचा नगरसेवकांचा अनुभव आहे.
आयुक्तांकडे नगरसेवक फिरकेनात!
आयुक्त संजय कापडणीस यांना प्रभागातील समस्यांबाबत वारंवार सूचना केल्यानंतरही समस्या निकाली निघत नसल्याचा नगरसेवकांना अनुभव येत आहे. आयुक्तांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्यावरही आयुक्तांच्या सूचनांचे पालन होत नसल्यामुळे आयुक्तांच्या दालनाकडे नगरसेवक फिरकत नसल्याचे बोलल्या जात आहे.