मनपा पुन्हा रस्त्यावर उतरून करणार जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 07:37 PM2020-09-08T19:37:25+5:302020-09-08T19:37:33+5:30
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकारी व आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करा, असे निर्देश दिले.
अकोला : महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असल्याचे समोर आले असून, मंगळवारी आणखी ७८ रुग्णांची भर पडली असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पृष्ठभूमीवर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकारी व आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करा, असे निर्देश दिले.
जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण एप्रिल महिन्यात मनपा क्षेत्रात आढळून आला होता. त्यानंतर शहराच्या कानाकोपऱ्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र समोर आले होते. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा दिवसरात्र कामाला लागली होती. झोन अधिकारी, मालमत्ता कर वसुली विभागातील वसुली निरीक्षक, शिक्षक तसेच आशा सेविका सक्रिय झाल्या होत्या. त्यामुळे अकोला शहर कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर होते. शहरानंतर ग्रामीण भागाकडे कोरोनाने मोर्चा वळविला होता; मात्र आता पुन्हा एकदा ग्रामीणसह शहरातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. याकरिता आयुक्त संजय कापडणीस यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन थेट लोकांमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे. अनलॉकमुळे नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यांना थांबविता येणार नाही; मात्र प्रत्येकाने सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठीच आता जनजागृतीची मोहीम होती घेऊन कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचा बडगाही उचलण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.