देशातील पहिला ‘काँक्रीट’ पूल झाला नव्वदीचा!
By admin | Published: August 4, 2016 01:46 AM2016-08-04T01:46:32+5:302016-08-04T01:46:32+5:30
गांधीग्रामचा पूर्णा नदीवरील पूल मुदतबाहय़.
अतुल जयस्वाल
अकोला, दि.३- अकोला जिल्हय़ातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर बांधलेला पूल हा देशातील पहिला सिमेंट काँक्रीटचा पूल असून, त्याच्या बांधकामाला आजरोजी ८९ वर्ष पूर्ण झाली आहेत. कालबाहय़ झालेला हा पूल पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती असल्यामुळे येथे ह्यमहाडह्ण पूल घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मध्य प्रदेशातील हरिसाल व आंध्र प्रदेशातील हैदराबाद या दोन शहरांना जोडणारा मार्ग अकोला जिल्हय़ातून जातो. आकोट ते अकोलादरम्यान असलेल्या गांधीग्राम येथून वाहणार्या पूर्णा नदीवर तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या अमदानीत बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन १८ जुलै १९२७ रोजी मॉटेंग्यू बटलर या ब्रिटीश अधिकार्याच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत हा पूल पुर्णा नदीत उभा आहे. या पुलाची उंची सहा मीटर असून, त्याला १५ मीटरचे आठ गाळे आहेत. तब्बल ९0 वर्षांचे वय झालेल्या या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा जवळचा दुवा असलेला हा पूल आता मुदतबाहय़ झाला आहे. या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळय़ात पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहते. सलग दोन ते तीन दिवस या पुलावर १५ ते २0 फूट पाणी असते. एवढय़ा वर्षांपासून पुराचे तडाखे सहन केलेला हा पूल कवकुवत झाला आहे. त्यामुळे गांधीग्राम येथेही ह्यमहाडह्ण घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते.
ब्रिटनहून येतात पत्र
गांधीग्रामचा हा पूल ब्रिटिशांच्या काळात बांधलेला आहे. त्यामुळे या पुलाचा संपूर्ण लेखाजोखा ब्रिटिश कंपनीकडे आहे. दरवर्षी या पुलाच्या देखरेखीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला ब्रिटनहून पत्र पाठविले जाते. पुलाची मुदत संपल्याचा उल्लेख या पत्रात असतो.