अकोला : ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला दिलेल्या कोट्यवधींच्या निधीत प्रचंड भ्रष्टाचार झाला. त्या समित्यांकडून भ्रष्टाचाराची रक्कम मार्च २०१९ अखेर वसूल करण्याचा ‘अल्टिमेटम’ जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला शासनाने दिला होता. त्यापैकी सहा पाणी पुरवठा योजनांमध्ये केलेल्या अपहारप्रकरणी फौजदारी कारवाईसाठी पोलिसांत तक्रारी देण्यात आल्या. त्यावर अद्याप कारवाई न झाल्याने समिती पदाधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे सोपविण्यात आली. समितीने केलेल्या कामात कोट्यवधींच्या अपहाराचीच प्रकरणे पुढे आली. त्यामुळे समितीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. ठरलेल्या काळात पूर्ण न झालेल्या तसेच तीन वर्षांपासून प्रलंबित योजना शिल्लक निधीसह जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील शाखा अभियंत्यांना योजनेचे काम तपासण्याचे उद्दिष्ट दिले. अपूर्ण कामांचे मूल्यांकन करून उर्वरित निधी जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर देण्यात आली. सर्वच जिल्ह्यांमध्ये असलेल्या योजनांची कामे, अपूर्ण कामे, खर्च, शिल्लक निधी, वसूलपात्र रकमेचा शोध घेऊन तातडीने योजना हस्तांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले, तर अपहारित रकमेची वसुली ३१ मार्च २०१९ पर्यंत करण्याचेही बजावले.विविध पेयजल योजनेच्या जिल्ह्यातील ७२ पैकी ६९ योजना अपूर्ण आहेत. त्यासाठी २५ कोटी ६ लाख ७३ हजारांपैकी १६ कोटी ३९ लाख २५ हजार रुपये निधी खर्च झाला. त्या निधीचा हिशेब घेणे, काम पूर्ण झाले की नाही, याची पडताळणी करणे, त्यातून पुढे येणाºया अपहाराच्या प्रकरणात कारवाई करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने आधीच म्हणजे, २००९ ते २०१२ या काळात ८ प्रकरणांत फौजदारी कारवाई केली आहे. त्यानंतर सहा समित्यांवर ही कारवाई करण्यासाठी पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या आहेत.
फौजदारी तक्रार झालेल्या योजनेची गावेबार्शीटाकळी तालुक्यातील वाघजाळी योजनेत ४ लाख ६२ हजार, साहित-५.३१ लाख, चोहोगाव-१.८१ लाख, मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी-३.१९ लाख, रंभापूर-३.६० लाख, तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर-२.०९ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.