लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: येथील प्रतीक नगरमध्ये मित्राने नवीन बांधलेले घर पाहण्यासाठी छतावर चढून मोबाइलवर बोलत असताना उद्धव सखाराम किर्दक(३०) रा. कार्ली याचा ११ सप्टेंबर रोजी १२ वाजताच्या दरम्यान अकस्मात मृत्यू झाला होता; परंतु मृतक उद्धव याच्या आईने १३ सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस व न्यायालयात धाव घेऊन मुलाचा घातपात झाल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने मूर्तिजापूर शहर पोलिसांना मित्र अनिल तुकाराम सरिसे (३७) व त्याची पत्नी सूचिता अनिल सरिसे (३२) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश ३ जानेवारी रोजी बजावल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.मृतक उद्धव हा अनिल तुकाराम सरिसे याचा मित्र असून, उद्धवची वडिलोपार्जित असलेली शेती प्रकल्पात गेल्याने त्याला १३ लाख रुपयांच्यावर शासकीय मोबदला मिळाला होता. यातून आलेले ३ लाख रुपये अनिल सरिसे याला उसनवार म्हणून दिले होते. घटनेच्या दिवशी उद्धवने अनिलकडे पैशाची मागणी केली होती. पैसे परत करण्याचा होकार अनिलने दिल्याने तो पैसे घेण्यासाठी त्याच्याकडे गेला होता, असे उद्धव याची आई वच्छला सखाराम किर्दक (६५) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनेच्या दिवशी पैसे परत देण्याच्या बहाण्याने त्याला बोलावून घेतले; परंतु पैसे परत न देता संगनमत करून पती-पत्नीने माझ्या मुलाचा खून केल्याचा आरोप वच्छला किर्दक यांनी केला होता.दरम्यान, घटनेच्या दिवशी पुणे येथून नातेवाईक प्रकाश किर्दक याने माझा मुलगा उद्धव याला मोबाइलवर फोन केला असता त्याने आरोपी अनिल सरिसे याच्या घरी असल्याचे सांगितले. त्यानंतर माझा मुलगा उद्धव हा घरी लवकर परत न आल्यामुळे चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी माझ्या मुलाचा अपघात झाला असून, तो सरकारी दवाखान्यामध्ये भरती असल्याचे सांगितले. तेव्हा नातू प्रशांत हा सरकारी दवाखान्यात पोहोचला असता त्याला उद्धव हा मृतावस्थेत आढळून आला. आरोपीने पोलिसांना चुकीची माहिती देऊन सत्य परिस्थिती लपवून विजेचा धक्का लागल्याने अपघात होऊन मृत्यू झाल्याचे सांगितले; परंतु उद्धव याचा दोन्ही आरोपींनी संगनमत करून खून केला आहे व पुरावा नष्ट करण्याचे दृष्टीने पोलिसांना खोटी माहिती दिली, असा आरोप वच्छला किर्दक यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने पोलिसांना ३ जानेवारी रोजी सीआरपीसी १५६(३) कलम २०१, ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी उपरोक्त कलमान्वये आरोपी अनिल सरिसे व सूचिता सरिसे यांच्याविरुद्ध गुन्हा केला आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता गावडे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी )