अकोला जीएमसीत ५० शिकाऊ डॉक्टरांवर कोविडचा भार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 10:44 AM2021-04-08T10:44:10+5:302021-04-08T10:47:04+5:30
Akola GMC : वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असून कोविड वॉर्डाचा संपूर्ण भार येथील ५० शिकाऊ डॉक्टरांवर आला आहे.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात अकोल्यासह शेजारील जिल्ह्यातील कोविड रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. तुलनेने येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असून कोविड वॉर्डाचा संपूर्ण भार येथील ५० शिकाऊ डॉक्टरांवर आला आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आपले शैक्षणिक नुकसान टाळण्यासह इतर महत्त्वाच्या मागणीसाठी शिकाऊ डॉक्टरांनी बुधवारी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. सर्वोपचार रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांचा ताण वाढला आहे. त्या तुलनेत येथे उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने कोविड आणि नॉनकोविड रुग्णसेवेचा डोलारा शिकाऊ डॉक्टरांच्या खांद्यावर येत आहे. सर्वोपचार रुग्णालयात सध्या अकोल्यासह अमरावती, बुलडाणा, खामगाव, वाशिमसह हिंगोली आदी जिल्ह्यातील कोविड रुग्ण दाखल होत असून, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी केवळ ५० शिकाऊ डॉक्टरांवर आहे. रुग्णसेवेचा ताण वाढल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याने बुधवारी शिकाऊ डॉक्टरांनी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. शिवाय, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील यावेळी त्यांनी दिला.
कोविड रुग्णांवर स्त्रीरोग अन् त्वचारोगतज्ज्ञ करताहेत उपचार
सर्वोपचार रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये सर्वोपचार रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असलेल्या ५० शिकाऊ डॉक्टरांचा समावेश असून ते त्वचा विकार, स्त्री रोग, नेत्ररोग आदि विभागाशी निगडित डॉक्टर असल्याचे शिकाऊ डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कोविडवरील उपचारासाठी आवश्यक छातीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणीही शिकाऊ डॉक्टरांनी केली.
या आहेत मागण्या
- कोविड स्पेशालिस्ट डॉक्टर नियुक्त करा.
- शैक्षणिक शुल्क कमी करा.
- शिकाऊ डॉक्टरांना कोरोना ड्यूटीतून रिलिव्ह करा.
- नॉनकोविड रुग्णांवरही उपचार सुरू ठेवा.
पाच डॉक्टर पॉझिटिव्ह
सर्वाेपचार रुग्णालयात कोविड वॉर्डात सेवा देणाऱ्या ५० शिकाऊ डॉक्टरांपैकी सद्यस्थितीत ५ डॉक्टर पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत १६ पेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊन गेली असून, यातील काहींना पोस्ट कोविडची समस्याही उद्भवत असल्याचे शिकाऊ डॉक्टरांनी सांगितले.
सर्वोपचार रुग्णालयातील कोविड रुग्णांचा संपूर्ण भार हा शिकाऊ डाॅक्टरांवर आहे. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात अधिष्ठाता यांच्याशी चर्चा केल्यास आमचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याच्या धमक्या मिळतात. आमच्या शैक्षणिक नुकसानासह नॉनकोविड रुग्णांकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आमच्या मागण्यांसंदर्भात आम्ही बुधवारी अधिष्ठाता यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. मागण्या मान्य होत नसतील, तर आम्ही तीव्र आंदोलन पुकारू.
- डॉ. संदीप हाडे, उपाध्यक्ष, सेंट्रल मार्ड, अकाेला