मैत्रेयच्या दोन संचालकांसह शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2016 01:43 AM2016-08-04T01:43:24+5:302016-08-04T01:43:24+5:30
५00 ते ६00 नागरिकांची फसवणूक झाल्याची शक्यता.
अकोला, दि. ३- मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आकर्षक योजनांचे आमिष दाखवून शहरातील शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली आणि मुदत पूर्ण होऊनही रक्कम परत केली नाही. दिलेले धनादेशही अनादरित झाले. फसवणूक झाल्यामुळे नागरिकांनी बुधवारी रात्री रामदासपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी रात्री ८.३0 वाजता कंपनीचे संचालक वर्षा मधुसूदन सत्पाळकर (रा. विरार), जनार्दन अरविंद परूळेकर (रा. वसई) आणि शाखा व्यवस्थापक अशोक बैस (रा. शेगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
शहरातील मलकापूर येथील सुरेखा नगरात राहणारे प्रशांत रामदास मानेकर (४३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी काही वर्षांपूर्वी मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अकोला शाखा कार्यालयात चार विमा काढले होते. त्यासाठी त्यांनी कंपनीकडे १ लाख ८00 रुपये भरले होते. गुंतवणुकीच्या रकमेची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मैत्रेय कंपनी शाखा कार्यालयात संपर्क केला. कंपनीने त्यांना एक धनादेश दिला. हा धनादेश त्यांनी बँकेत वटविण्यासाठी नेला; परंतु धनादेश अनादरित झाला. त्यांनी कंपनीकडे याची तक्रार केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यांनी कंपनीकडे रकमेची मागणी केली; परंतु कंपनीने त्यांना रक्कम परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मानेकर यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला. मैत्रेय प्रा. लि. कंपनीने शहरातील ५00 ते ६00 नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. नागरिकांना आकर्षक योजनांचे आमिष दाखविण्यात आले. नागरिकांनी कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर भरलेल्या रकमेची मुदत पूर्ण झाली. नागरिकांनी कंपनीकडे रकमेची मागणी केली; परंतु कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दिलेले धनादेशही वटले नाहीत. दरम्यान प्रशांत मानेकर यांच्यासोबतच शहरातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी मैत्रेय कंपनीने फसवणूक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार शहरात जवळपास ५00 ते ६00 च्यावर नागरिकांची कंपनीने फसवणूक केल्याचा अंदाज आहे. यादीनुसार रामदासपेठ पोलीस किती रुपयांनी नागरिकांची फसवणूक झाली, याची तपासणी करणार आहे.
"मैत्रेय कंपनीने शहरातील शेकडो नागरिकांची फसवणूक केली. त्यानुसार कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आमच्याकडे फसवणूक झालेल्या ३00 जणांची यादी आहे. पोलीस निरीक्षक सुभाष माकोडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे."
- दिलीप पोटभरे
पोलीस उपनिरीक्षक