पातूरमध्ये रविवारी महा पीक कर्ज मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 02:04 PM2018-07-07T14:04:03+5:302018-07-07T14:06:02+5:30
आलेगाव: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशावरून पातूर तालुक्यात रविवार, ८ जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी महा पीक कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आलेगाव: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशावरून पातूर तालुक्यात रविवार, ८ जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी महा पीक कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पातूर तालुक्यातील शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या आदेशाने शुक्रवारी बाळापूरचे उप -विभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे व डॉ. रामेश्वर पुरी तहसीलदार यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यामुळे रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी त्या दिवशी पातूर तालुक्यातील सर्व बँका उघड्या ठेवण्याचे आदेश देण्यात आले. रविवारी या सर्व बँकांमध्ये केवळ पीक कर्ज वाटपाचे काम होणार असून, तालुक्यातील शेतकरी वर्गाने त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे घेऊन बँकेत यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, यासाठी सर्व शासकीय यंत्रणा रविवारी राबणार असून, यावेळी बँकांमध्ये तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, पीक कर्ज वाटपाचे काम व्यवस्थित होत आहे की नाही, याची संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष सर्व बँकांना भेट देऊन पाहणी करणार आहेत, तालुक्यातील शेतकऱ्यांनी या महापीक कर्ज मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उप-विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, पातूर तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांनी केले आहे.