परिसरात पावसाअभावी एक महिना उशिरा पेरण्या करण्यात आल्या. पेरणी झाल्यानंतर शेतातील पिके बहरलेली होती. परंतु सतत पाऊस येत असल्यामुळे कपाशी पिकाची वाढ खुंटली असून शेतामध्ये पिकांबरोबरच तणाचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. आधीच या भागातील मूग, उडिद, सोयाबीन ही पिके हातची गेली आहेत. कपाशी पिकावर परिसरातील शेतकऱ्यांची आशा होती. परंतु सततच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साठवून कपाशी पिकाची वाढ खुंटली आहे. त्याचप्रमाणे शेतात पिकांच्यासोबत गवतसुद्धा वाढत असल्याने आंतर मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षीसुद्धा मूग, उडिद, सोयाबीन पिकांमध्ये कमालीची घट झाली. सुरुवातीला मृग नक्षत्रामध्ये पावसाने दडी मारल्यानंतर एका महिन्यानंतर पाऊस आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु आता सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पुरेसा सूर्यप्रकाश पिकांना मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
आधीच मूग, उडिदाचे पीक हातचे निघून गेले. असून कपाशी पिकावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. परंतु सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असून, उत्पादनातही घट येणार आहे. तसेच कपाशी पिकावर कोकड्याने आक्रमण केले आहे.
-मोहन कडू, शेतकरी लोतखेड