तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अनेक भागात पेरणी केली आहे, तर काही ठिकाणी पाऊसच नसल्याने अजूनही जमीन काळी असून, पेरणीसाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या आहेत त्यांना आता पावसाची नितांत गरज आहे. महागडे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी शेती पेरली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनवर आता दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. काही भागात पेरणीपूर्व मशागत आटोपली असली तरी पाऊस न आल्याने पेरण्या रखडल्या आहेत. किमान ३५ टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. आता पावसाची नितांत गरज असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.
फोटो:
पाण्याअभावी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर
पाण्याअभावी महागाईचे सोयाबीन व तूर, मूग, उडीद, आदी पेरलेले बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, तर उगवलेले बियाणे कोमेजून मरत आहे. येत्या दोन दिवसांत तालुक्यात पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांना निश्चितच दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे. अशातच पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत अजूनही पेरण्या केलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले, तर शासनाने संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणी करण्याकरिता मोफत खत व बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अरविंद कोकाटे यांनी शासनाकडे केली आहे.