अतिक्रमीत रस्ते लोकसहभागातून होणार मोकळे!
By Admin | Published: August 5, 2016 12:42 AM2016-08-05T00:42:14+5:302016-08-05T00:42:14+5:30
महाराजस्व अभियानांतर्गत राज्यभरात राबवली जाणार विशेष मोहीम.
वाशिम, दि. ४ - गाव नकाशात दर्शविल्याप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले पाणंद रस्ते, शिवाररस्ते, शेतांमध्ये जाण्यासाठी तयार केलेली पाउलवाट लोकसहभागातून मोकळी केली जाणार आहे. यासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी गुरूवारी दिली.
१ ऑगस्ट २0१६ ते ३१ जुलै २0१७ या वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण राज्यात महाराजस्व अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत सर्वसामान्य जनता व शेतकर्यांचे महसूल विभागासंदर्भातील प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यानुसार, ग्रामीण भागातील शेतशिवारांमध्ये जाणारे पाणंद रस्ते, शिवाररस्ते, पाउलवाट आदींबाबतची माहिती संबंधित तलाठय़ांकडून संकलित करून दर्शनी भागात प्रकाशित केली जाणार आहे.
जे शेतकरी अतिक्रमीत व बंद झालेले रस्ते मोकळे करून देण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतील, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही; पण ज्यांनी या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. महाराजस्व अभियानांतर्गत मोकळे केले जाणारे ६ फूट किंवा त्यापेक्षा अधिक रुंदीचे रस्ते महात्मा गांधी रोजगार हमी योजना किंवा जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून विकसीत करावे, असे शासनाचे निर्देश आहेत.
"वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात यापूर्वी देखील अतिक्रमीत व विविध कारणांनी बंद झालेले शेतरस्ते, पाउलवाट मोकळी करण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यास बर्यापैकी यश मिळाले. महाराजस्व अभियानांतर्गत ही मोहीम अधिक गतीमान केली जाईल."
राजेंद्र देशमुख
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम