बाजारपेठेत उसळली गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:12+5:302021-06-16T04:26:12+5:30
अकोला : निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर, अकोला शहरातील बाजारपेठ आणि रस्त्यांवर प्रचंड गर्दी उसळत असून, वाहतुकीतही खोळंबा निर्माण होत ...
अकोला : निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर, अकोला शहरातील बाजारपेठ आणि रस्त्यांवर प्रचंड गर्दी उसळत असून, वाहतुकीतही खोळंबा निर्माण होत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाल्याचे वास्तव सोमवारी समोर आले. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू संसर्गाचा कहर रोखणार तरी कसा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात गत फेब्रुवारी ते मे
महिन्याअखेरपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढला. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. जून महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत शिथिलता देण्यात आली. निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर अकोला शहरातील बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शहरातील गांधी मार्ग ते ताजनापेठ परिसर, चांदेकर चौक ते फतेह चौक परिसर, टिळक रोड, टॉवर चौक आदी भागात सोमवारी दुपारी प्रचंड गर्दी झाली होती. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने, बाजारपेठ परिसरांमध्ये वाहतुकीत खोळंबा निर्माण झाल्याचे दिसत होते. शहरातील बाजारपेठसह रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणार कसा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
...तर नाइलाजाने कडक निर्बंध
लागू करावे लागतील -जिल्हाधिकारी
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात लागू केलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर शहरातील बाजारपेठ आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन होत नसेल, तर नाइलाजाने कडक निर्बंध लागू करावे लागतील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
......फोटो......