- संतोष येलकर
अकोला : राज्यात वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने, निर्माण झालेल्या वाळू टंचाईच्या परिस्थितीत शासकीय व खासगी बांधकामांसाठी वाळूची गरज भागविण्याकरिता दगडाची चुरी (क्रश सॅण्ड) चा वापर वाढला आहे. त्यामुळे बांधकामांसाठी वाळूची उणीव भरुन काढण्यासाठी ‘क्रश सॅण्ड ’ ची मात्रा प्रभावी ठरत आहे.राष्ट्रीय हरित लवादाच्या ११ डिसेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांसंदर्भात पर्यावरण विभागाने गत १५ जानेवारी २०१६ रोजी काढलेली अधिसूचना निलंबित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हास्तरीय पर्यावरण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली आहे. वाळू उपलब्ध नसल्याच्या स्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध बांधकामे, पाटबंधारे विभागांतर्गत सिंचन अनुशेष योजनेंतर्गत सिंचन प्रकल्पांची कामे रखडली आहेत. शासकीय बांधकामांसोबतच खासगी इमारतींची बांधकामेही प्रभावित झाली आहेत. त्यानुषंगाने वाळू टंचाईच्या परिस्थितीत शासकीय आणि खासगी बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या वाळूची गरज भागविण्यासाठी ‘क्रश सॅण्ड’चा वापर वाढला असून, खदानधारकांकडे ‘क्रश सॅण्ड’ करिता होणाऱ्या मागणीतही वाढ झाली आहे.