- संतोषकुमार गवई लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातूर हे ठिकाण ऐतिहासिक असून, अनेक बाबींसाठी प्रसिद्ध आहे. आता याच बरोबर पातूरची नवी ओळख ही सीताफळासाठी वाढत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात सीताफळांच्या बागा बहरल्या असून, सध्या बाजारपेठेत सीताफळांची आवक वाढली आहे. त्यामुळे ही मार्केट जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांना आपल्याकडे खेचत असल्याचे चित्र आहे.पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळशेतीला अधिक पसंती दिली आहे. शहरात फूल शेती, बागायती तसेच सीताफळ शेतीलाही अधिक पसंती शेतकºयांनी दिली आहे. सध्या सीताफळ बाजारात येत असल्याने पातूरची बाजारपेठ सीताफळांनी बहरली आहे. खाण्यास चविष्ट व आरोग्यासाठी लाभदायक असल्याने सीताफळांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे येथील बाजारपेठेत खामगाव, वाशिम, बुलडाणा, अकोला येथील व्यापारी गर्दी करीत आहे. येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सीताफळांची आवक वाढल्याने बाजारपेठ ही सीताफळासाठी प्रसिद्ध होत असल्याचे दिसत आहेत. दररोज बाजारपेठेमध्ये गर्दी वाढत असून, लाखोंची उलाढाल होत आहे.शहरात सीताफळांची मोठे मार्केट असून, खूप मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. सीताफळ खरेदीसाठी दुरून फळविक्रेत्यांसह ग्राहक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीने भरपूर असलेला पातूर तालुका गोड आंब्यासोबतच गुणकारी गोड सीताफळासाठीसुद्धा ओळखला जाते. त्यामुळे अकोला, वाशिम, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर, खामगावसह परजिल्ह्यातील व्यापारी शहरांमधून सीताफळाच्या खरेदीसाठी येत आहेत.सीताफळ खाण्याचे फायदेसीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृदयासाठी फायदेशीर असे आहे. उच्च रक्तदाब तसेच हृदरोगाच्या रुग्यांनी सीताफळ खाणे फायदेशीर ठरते. सीताफळात व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे. सीताफळांच्या बियांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सीताफळ सेवनाने कॅन्सर आणि डायबेटिससारख्या आजारांवरसुद्धा नियंत्रण मिळविता येते.