रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली महाकाय वृक्ष कापली; विद्युत पोल ‘जैसे थे’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:20 AM2021-07-28T04:20:25+5:302021-07-28T04:20:25+5:30
वाडेगाव: पातूर-बाळापूर राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, या कामाच्या नावाखाली रस्त्यालगत असलेल्या महाकाय वृक्षांची कत्तल करण्यात आली. ...
वाडेगाव: पातूर-बाळापूर राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, या कामाच्या नावाखाली रस्त्यालगत असलेल्या महाकाय वृक्षांची कत्तल करण्यात आली. मात्र, रस्त्यात अडथळा ठरणारे विद्युत खांब ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. अपघातास कारणीभूत ठरणारे हे विद्युत खांब कधी काढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र, विकासाच्या नावाखाली जुन्या वृक्षांची खुलेआम कत्तल केल्या जात असल्याचे चित्र पातूर-बाळापूर मार्गावरील वाडेगाव परिसरात दिसून येत आहे. सद्यस्थितीत बाळापूर-पातूर राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, हे काम करताना रस्त्यालगत असलेल्या महाकाय वृक्षांची अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणावरून कत्तल करण्यात आली. दुसरीकडे अतिक्रमणास पोषक ठरत असलेले विद्युत खांब रस्त्यात जैसे थे उभे असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यालगत येत असलेले विद्युत खांब काढून रस्त्याच्या दुतर्फा रुंदीकरणाचे दर्जेदार काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. __________________________________
दुतर्फा नाल्या करण्याची मागणी
वाडेगाव येथील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने ग्रामस्थांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथील रस्त्यावरील सिद्धार्थनगर-श्री जागेश्वर विद्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या बांधून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
__________________________________
अपघाताची शक्यता
वाडेगाव येथील राज्य महामार्गावरील अकोला टी-पाॅइंट-श्री जागेश्वर विद्यालयापर्यंत रस्त्यालगत विद्युत खांब उभे असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.