अकोला : ‘पीएम टर्म प्लॅन’च्या गोंडस नावाखाली ई-मेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर जाळे टाकले जात आहेत. याबाबत वेळीच सावधगिरी बाळगली नाही, तर फसवणूक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सायबर गुन्हे अन्वेषण शाखेची या प्रकाराकडे डोळेझाक आहे.दैनंदिन कार्यालयीन कामासाठी ई-मेल आणि इतर सोशल मीडियांच्या ग्रुपवर असलेल्या अनेकांना गत काही दिवसांपासून पीएम टर्म प्लॅनच्या योजनाचे मेल येत आहेत. केवळ १३ रुपयांत १ कोटीचा जीवन विमा कव्हर, असे संदेश देत जाळे टाकल्या जात आहे. कमी रकमेत कोट्यवधीचा विमा काढला जात असल्याने अनेकजण या गोंडस आमिषाला बळी पडत आहेत. प्राप्तिकर भरणाच्या अंतिम चरणात वित्तीय सुरक्षेची हमी दाखवून टॅक्स बचतीचे सल्ले दिले जात अनेकजण रक्कम पाठवून मोकळे होतात. वास्तविक पाहता, अशा अनेक बनावट कंपन्या तयार झाल्या असून, सर्वसामान्य माणसाला लुटण्याचा गोरखधंदा एक यंत्रणा करीत असल्याचे समोर येत आहे.ई-मेल आणि सोशल मीडियावरील संदेशात अमूक-अमूक क्रमांकावर संपर्क साधा, विस्तारपूर्वक माहिती घ्या, असे अंगुलीनिर्देश दिले जातात. दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता, त्यांना रक्कम भरण्याचे सुचविले जाते. यातून अनेकांची फसवणूक होत असून, याकडे सायबर सेलचे दुर्लक्ष आहे. वास्तविक पाहता, ‘पीएम’चा अर्थ सर्वसामान्य व्यक्ती पंतप्रधान असाच काढतो. त्याचाच दुरुपयोग केला जात आहे. एजन्सीने पीएमचा कंसातील अर्थ ‘प्राइम मॅजिक’ दर्शविला आहे. फसवणूक टाळण्यासाठी चौकस राहूनच व्यवहार करावा, असे जाणकारांनी सांगितले.इन्श्यूरन्स साइट तपासणाऱ्यांना जाते हेरल्याजर तुम्ही इंटरनेटवर इन्श्यूरन्स कंपन्यांच्या साइटची माहिती घेत असाल तर काही वेळातच तुम्हाला हेरल्या जाते आणि ‘पीएम टर्म प्लॅन’च्या योजनांचे आमिष देण्याचे मॅसेज तुमच्या मेलवर कायम आदळतात. फसवणूक होण्याची पहिली सुरुवात येथूनच होत आहे.