अकोला: दुग्ध व्यवसाय हा शेणाचा धंदा नसून, तरुणांनी तो एक कंपनी म्हणून चालवावा, असा मोलाचा सल्ला फलटण स्थीत गोविंद मिल्क चे महाव्यवस्थापक डॉ. शातांराम गायकवाड यांनी दिला. स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला, तर्फे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत आयोजीत 'आधुनिक दुग्ध व्यवसाय उद्योजकता विकास' या विषयावरील पाच दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. माधव पाटील, सहयोगी अधिष्ठाता उदगीर व डॉ. नंदकिशोर अकोटकर, व्यवस्थापक आयडीबीआय बँक होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत कपले यानी केले.
कार्यक्रम समारोप प्रसंगी डॉ. प्रशांत वासनिक अधिष्ठाता दुग्ध तंत्रज्ञान मपमविवि नागपूर,डॉ. नितिन मार्कडेंय सहयोगी अधिष्ठता परभणी व डॉ. संतोष शिंदे हे उपस्थीत होते.
प्रशिक्षण कार्यक्रमात किफायतशीर मुक्त संचार गोठा, मुरघास निर्मिती, प्रजननव्यस्थापन, रोगनियंत्रण,एकात्मीक पशुपालन, टाकाउपासून टिकाउ व मुल्यवर्धित दुग्ध पदार्थ आदी विषयावर सुप्रसिद्ध पशुतज्ञ डॉ. शैलेश मदने, डॉ.चंद्रप्रकाश खेडकर, डॉ. साईनाथ भोकरे, डॉ. विजय केळे, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ आरीफ शेख, डॉ. संदिप रिंधे, डॉ. वैभव लुल्ले, डॉ. अभय कुलकर्णी व मुकुंद गिरी यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील ५० नव- उद्योजक, शेतकरी, पशुपालक, दुग्ध व्यावसायिक, सुशिक्षित बेरोजगार युवक व महिला यानी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसमन्वयक डॉ. दिलीप बदुकले, डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. मोहीनी खोडके, डॉ. कुलदीप देशपांडे , डॉ. मंगेश वड्डे व डॉ. नरेश कुलकर्णी यानी परिश्रम घेतले.