मोफत धान्य वाटपात मिळाली नाही डाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:03 AM2020-07-28T11:03:17+5:302020-07-28T11:03:32+5:30
प्रति शिधापत्रिका एक किलोप्रमाणे हरभरा किंवा तूर डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी डाळीचा साठा अद्याप राज्यातील जिल्हास्तरावर उपलब्ध झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत जुलै ते नोव्हेबर या कालावधीत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी तीन किलो गहू व दोन किलो तांदळाचे मोफत वितरण सुरू करण्यात आले असले तरी, मोफत धान्य वाटपात प्रति शिधापत्रिका एक किलोप्रमाणे हरभरा किंवा तूर डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी डाळीचा साठा अद्याप राज्यातील जिल्हास्तरावर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हरभरा व तूर डाळीचा साठा तेव्हा उपलब्ध होणार आणि गरीब शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल ते जून तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ५ किलो तांदळासोबत प्रति शिधापत्रिका एक किलो हरभरा किंवा तूर यापैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्यात आले होते. त्यानंतर शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १० जुलै रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील पत्रिकाधारक लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे; परंतु गहू व तांदळासोबतच प्रति शिधापत्रिका १ किलोप्रमाणे हरभरा किंवा तूर यापैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी हरभरा व तूर डाळीचा साठा राज्यातील जिल्हास्तरावर अद्याप उपलब्ध झाला नाही. त्यामुळे मोफत धान्य वाटपात राज्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी हरभरा व तूर डाळीचा साठा केव्हा उपलब्ध होणार आणि गरीब शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचा लाभ केव्हा मिळणार, यासंदर्भात प्रतीक्षा केली जात आहे.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे जुलै ते नोव्हेंबर या कालावधीसाठी जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे मोफत धान्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. या धान्यासोबतच प्रति शिधापत्रिका एक किलोप्रमाणे हरभरा किंवा तूर डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी डाळीचा साठा अद्याप प्राप्त झाला नाही. साठा उपलब्ध होताच डाळीचे मोफत वितरण सुरू करण्यात येणार आहे.
-बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला