अकोला: सुधीर कॉलनी येथील रहिवासी असलेल्या व टेलीफोन विभागातील सेवानवृत्त कर्मचारी जगदेवराव पवार यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री धुडगूस घालीत सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून या प्रकरणातील संशयित चोरट्यांची सिव्हिल लाइन्स पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात येत आहे. सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार घनश्याम पाटील यांनी गत तीन दिवसांमध्ये १0 ते १२ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सुधीर कॉलनीमध्ये जगदेवराव अमृतराव पवार यांचे ह्यअमृतवनह्ण हे निवासस्थान आहे. पवार कुटुंबीय शुक्रवारी मध्यरात्री झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या स्वयंपाकगृहाच्या खिडकीचे लोखंड वाकवून घरात प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाकगृहातच असलेल्या कपाटातील सुमारे ६ लाख रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. याच कपाटाच्या आतमध्ये असलेली ८ हजार रुपयांची रोखही चोरट्यांनी लंपास केली. कपाटाच्या बाजूलाच दुचाकीची किल्ली सापडल्याने त्यांनी एम एच ३0-३३५२ क्रमांकाची दुचाकीही लंपास केली होती. सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे ५ लाख रुपये असून, रोख ८ हजार रुपये आणि दुचाकी, असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. पवार कुटुंबीय घरात असताना चोरट्यांनी घरातील कपाट फोडून माल लंपास केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी जगदेवराव पवार यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील चोरट्यांचा शोध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सुरू केला असून संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
घरफोडी प्रकरणातील संशयितांची झाडाझडती
By admin | Published: July 20, 2016 1:40 AM