लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये वाटप केले जाणारे धान्य भारतीय खाद्य निगमकडून केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, माथाडी मंडळाच्या मध्यस्थीने या कामाचा तिढा सुटला असून, शुक्रवारपासून काम सुरू झाले आहे. या गोदामातील कामगारांच्या दुराग्रहामुळे पंधरा दिवसात धान्य साठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यासाठी भारतीय खाद्य निगमकडून धान्य खरेदी केले जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध करून देण्यासाठी खाद्य निगमने केंद्रीय वखार महामंडळाचे अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील गोदाम भाड्याने घेतले आहेत. गोदाम क्रमांक दोनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देय असलेल्या धान्याचा साठा करण्याचे काम सुरू असतानाच वखार महामंडळाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पंधरा दिवसांपासून अचानक काम बंद करण्यात आले. कामगारांनी त्यांच्या मागणीसाठी वखार महामंडळाच्या ‘एच अॅण्ड टी’ काम करणाºया व्यवस्थापनाकडे दाद न मागता माथाडी मंडळाकडे धाव घेतली, तसेच त्यासाठी १५ दिवसांपेक्षा अधिक काळ काम बंदही ठेवले.दरम्यान, जिल्हाधिकाºयांना लाभार्थींसाठी देय असलेल्या धान्य साठ्याचे काम बंद झाल्याने जिल्हा प्रशासनाचीही अडचण झाली. याप्रकरणी माथाडी मंडळाने कामगारांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली, तसेच कामगारांच्या मागण्यांबाबत वखार महामंडळ, ‘एच अॅण्ड टी’ व्यवस्थापनाकडूनच निर्णय घेणे आवश्यक असताना जिल्हाधिकाºयांच्या धान्याचे काम बंद ठेवण्याबद्दल गोदाम व्यवस्थापक एन.बी.सिंग यांना नोटिसही बजावली. तरीही काम सुरू न झाल्याने भारतीय खाद्य निगमने याची गंभीर दखल घेत केंद्रीय वखार महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापकांसह सिंग यांना दोन नोटिस बजावल्या. या कागदपत्रांच्या गदारोळात धान्य साठ्याचे काम तब्बल १५ दिवस बंद राहिले. दरम्यान, खाद्य निगमचे नागपूर विभागीय व्यवस्थापक बी.एम.राऊत यांनी २ जून रोजी पुन्हा नोटिस देत धान्य साठ्याचे काम सुरू करण्याचे वखार महामंडळाला बजावले. त्यानंतर ५ जून रोजी काम सुरू केल्याचे गोदाम व्यवस्थापक सिंग यांनी सांगितले.