निकृष्ट बांधकामात फसल्याने बैलांचा मृत्यू; सरपंच, सचिवावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 01:13 PM2019-12-08T13:13:27+5:302019-12-08T13:13:35+5:30
इंगळे यांनी दोन्ही बैलांवर उपचार केले; मात्र पायाला लोखंड तसेच सिमेंटमुळे गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील पुलाचे बांधकाम निकृष्ट करण्यात आले असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने पुलावर पडलेल्या खड्ड्यात गोविंदा इंगळे यांच्या बैलांचा पाय फसल्याने जखमा होऊन मृत्यू झाल्याची घटना २०१५ मध्ये घडली. याविरोधात गोविंदा इंगळे यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर सह दिवाणी न्यायाधीश यांनी अंत्री मलकापूरच्या सरपंच व सचिवावर कारवाई करण्याचा आदेश देत या दोघांनी गोविंदा इंगळे यांना ८० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश २६ नोव्हेंबर रोजी दिला.
हा पूल निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी आधीच करण्यात आल्या होत्या; मात्र सरपंच व सचिवाची मिलीभगत असल्याने त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे इंगळे यांनी सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात पुराव्यानीशी दावा दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर अंत्री मलकापूर येथील सरपंच व सचिवाने हलगर्जी केली असून, निष्काळजीपणे कारभार चालविला आहे. त्यामुळे गोविंदा गोटीराम इंगळे यांच्या बैलांचा मृत्यू झाला असून, त्याची नुकसान भरपाई म्हणून येथील सरपंच व सचिवाने गोविंदा इंगळे यांना एका महिन्याच्या आत ८० हजार रुपये द्यावे तसेच २०१५ पासून ते आतापर्यंत ६ टक्के व्याजदराने रक्कमही देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी गोविंदा इंगळे यांच्यावतीने अॅड. चंद्रकांत वानखडे यांनी भक्कमपणे बाजू मांडली. तसेच निकृष्ट बांधकामाचे पुरावे व दस्तऐवजही अॅड. वानखडे यांनी न्यायालयात सादर केले. त्यामुळेच या प्रकरणात सरपंच व सचिवावर कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अंत्री मलकापूर ते मोरझाडी या रस्त्यावर गोविंदा गोटीराम इंगळे यांचे शेत आहे. त्यामुळे ते त्यांच्या शेतात रोज बैलगाडी घेऊन जात होते. दरम्यान, शासनाने या रोडवरील एक पूल रोजगार हमी योजनेतून मंजूर करून त्याचे बांधकाम केले; मात्र सदरचे बांधकाम निकृ ष्ट दर्जाचे केल्याने या पुलावर मोठे खड्डे पडले. याच खड्ड्यांमुळे गोविंदा इंगळे यांच्या दोन्ही बैलांच्या पायाला जखमा झाल्या. इंगळे यांनी दोन्ही बैलांवर उपचार केले; मात्र पायाला लोखंड तसेच सिमेंटमुळे गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.