पातूर-बाळापूर रोडवरील डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या जवळील वळणावर अकोला-मेडशी महामार्गाच्या बायपास उड्डाणपुलाच्या पिलर निर्मितीच्या कामावर बिहारच्या राकेश रामराज गोंड (रा. बिशुनपुरा, शिवान, जगदीशपूर) या मजुराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून बुधवारी मृत्यू झाला. पिलरची बांधणी करीत असताना बाजूलाच काम करणाऱ्या पोकलँड मशीनमुळे सदर मातीचा ढिगारा घसरला. त्यामध्ये दबून मजुराचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. मोंटो कार्लो कंपनीच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा हा मजूर बळी ठरला असून, त्याच्या मृत्यूस मोंटो कार्लो कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मजूर करीत आहेत. याप्रकरणात पोलिसांकडून कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची गरज असतानाही, केवळ आकस्मिक मृत्यूची नोेंद करून प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले.
घटनास्थळाला तहसीलदार दीपक बाजड, पोलीस निरीक्षक हरीश गवळी, मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी बुधवारी भेट दिली होती. कंपनीविरुद्ध अनेक तक्रारी असूनसुद्धा जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मोंटो कार्लो कंपनी शासकीय नियमांची पायमल्ली करून कामकाज करीत आहे. परंतु त्याकडे जिल्हा प्रशासनासह पोलीस अधिकारीसुद्धा दुर्लक्ष करतात. मजुराच्या मृत्यूची घटना घडूनसुद्धा पोलिसांनी केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद करून कंपनीविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले.
मजुराच्या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चौकशी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान कोणी दोषी आढळून आल्यास, कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- हरीश गवळी, पोलीस निरीक्षक, पातूर