पारस येथून जवळच असलेल्या जोगलखेड येथील सुकलाल दांडगे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यामध्ये ते जखमी झाले हाेते. ही बातमी कळताच मामाला पाहण्यासाठी नात्याने भाची असलेल्या श्रद्धा संदीप शिरसाट (२८) व त्यांचा मुलगा आर्यन संदीप शिरसाट (८ ) (रा. रमाबाईनगर, हरिहरपेठ, अकोला) यांनी थेट मामाचे घर गाठले. त्यांची खुशाली घेऊन अकोल्याकडे घरी परतत असताना पारस रेल्वे स्टेशनवर रेल्वेरूळ ओलांडून सोबत असलेल्या दोन मुलींना आधी प्लॅटफाॅर्मवर पाेहाेचविले. त्यानंतर आई व मुलाने प्लॅटफाॅर्मवर जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेवढ्यातच अकोलाकडे जाणाऱ्या भरधाव ०२२५९ गीतांजली एक्स्प्रेस गाडीखाली येऊन दाेघेही चिरडल्या गेले. अपघात एवढा भीषण हाेता की, दाेघा मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मृतकाच्या नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. अकोला येथील जीआरपीएफ रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचारमध्ये पाठविण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर रेल्वे पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला नव्हता.
-------------
जाेखलखेड गावाकडून पारस रेल्वेस्टेशनवर आलेल्या श्रद्धा शिरसाट यांनी सुरुवातीला दाेन मुलींना रेल्वेरूळ ओलांडून प्लॅटफाॅर्मवर पाेहाेचविले. त्यानंतर मुलाला घेऊन त्या निघाल्या असता मुलाने लगेच जाण्यास विराेध केला, थाेडे थांबून जाऊ, असेही मुलाने म्हटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.