‘भूमिगत’ योजनेवर आज फैसला

By admin | Published: May 17, 2017 02:19 AM2017-05-17T02:19:24+5:302017-05-17T02:19:24+5:30

मुंबईत बैठक : मनपा आयुक्त रवाना

Decision on 'Underground' scheme today | ‘भूमिगत’ योजनेवर आज फैसला

‘भूमिगत’ योजनेवर आज फैसला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल) शासनाकडे सादर करण्यात आला असून, यासंदर्भात उद्या (बुधवार) नगर विकास विभागात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीत ‘भूमिगत’च्या योजनेला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. बैठकीसाठी मनपा आयुक्त अजय लहाने मंगळवारी रात्री मुंबईकडे रवाना झाले.
केंद्र शासनाच्या ‘अमृत’योजनेंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत बदल करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सादर केलेल्या २५४ कोटींच्या प्रकल्प अहवालाला राज्य शासनाने मंजुरी दिली. पहिल्या टप्प्यासाठी ११० कोटींचा निधी मनपाला प्राप्त झाला असून, त्यापैकी ८७ कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. योजनेंतर्गत मुख्य जलवाहिनी बदलण्यासह शहरात विविध ठिकाणी आठ जलकुंभ उभारल्या जातील. सदर काम पूर्ण होताच ‘अमृत’योजनेच्या माध्यमातून सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत गटार योजना राबवण्यात येईल. योजनेच्या माध्यमातून नाले-गटारांमधील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा शेती, उद्योगांसाठी वापर करता येऊ शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशी दुहेरी योजना निकाली काढण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे.
योजनेमध्ये एकूण प्रकल्पाच्या किमतीच्या केंद्र शासनाचा ५० टक्के आर्थिक हिस्सा असून, राज्य शासन व मनपाने प्रत्येकी २५ टक्के आर्थिक हिस्सा जमा करणे भाग आहे. भूमिगत गटार योजनेचा डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपवले. त्यानुषंगाने मजीप्राने ११० कोटींचा डीपीआर तयार करून शासनाकडे सादर केला. यासंदर्भात उद्या (बुधवार) नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठकीचे आयोजन केले असून, त्याकरिता मनपा आयुक्त अजय लहाने मुंबईसाठी रवाना झाले आहेत.

एमएलडी प्लान्टवरून काथ्याकूट!
मजीप्राने प्रस्तावित केलेल्या डीपीआरनुसार पूर्व झोनमध्ये ३० किंवा ७ एमएलडी आणि पश्चिम झोनमध्ये ३० एमएलडीचा प्लान्ट उभारला जाईल. पूर्व झोनमधील प्लान्ट कृषी नगर परिसरात रेल्वे लाइनला लागून उभारला जाईल. पूर्व झोनमध्ये ३० किंवा ७ एमएलडीचा प्लान्ट उभारल्यास देखभाल-दुरुस्तीचा किती खर्च येईल, या मुद्यावरून काथ्याकूट सुरू असल्याची माहिती आहे. वेळप्रसंगी पूर्व झोनमध्ये ३० एमएलडी प्लान्टवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Web Title: Decision on 'Underground' scheme today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.