पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 10:37 AM2021-02-08T10:37:21+5:302021-02-08T10:37:31+5:30
CoronaVirus News बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले.
अकोला: जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे, मात्र त्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी दिसून येत आहे. मागील पंधरा दिवसांचा आढावा घेतल्यास जिल्ह्यात ३९५ जणांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या तुलनेत केवळ २७१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद अकरण्यात आले असून बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची तीव्रता दिसून येत नाही, मात्र, परिस्थिती चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मागील पंधरा दिवसांचा आढावा घेतल्यास जिल्ह्यात कोविडचे ३९५ रुग्ण आढळून आले. या कालावधीत काही दिवस वगळल्यास पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याचे दिसून आले. या कालावधीत २५ व २६ जानेवारी, तसेच १ फेब्रुवारीला पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या जास्त होती. इतर दिवशी मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले.
गत १५ दिवसांतील स्थिती
मृत्यूच्या आकड्यांवर नियंत्रण
मागील पंधरा दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली, तरी मृत्यूचा आकडा नियंत्रणात असल्याचे दिसून आले. या कालावधीत पाच जणांना जीव गमवावा लागला असून दिवाळीपूर्वी ही स्थिती चिंताजनक होती. अकोलेकरांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.
जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी बेफिकरी करून चालणार नाही. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, नियमित मास्कचा वापर करावा, स्वच्छ हात धुवावे, इतरांपासून सुरक्षित अंतर राखावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ