पश्चिम वऱ्हाडातील जलसाठ्यात घट; सात धरणांचा जलसाठा शून्य टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 03:21 PM2019-06-25T15:21:51+5:302019-06-25T15:21:56+5:30
अकोला: पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यातील सात धरणातील जलसाठा शून्य टक्के असून, उर्वरित पाच धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे.
अकोला: पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यातील सात धरणातील जलसाठा शून्य टक्के असून, उर्वरित पाच धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. यात सर्वाधिक भीषण परिस्थिती बुलडाणा जिल्ह्यातील आहे. दरम्यान, वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात केवळ १०.५५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात पाच मोठे व १४ मध्यम सिंचन (धरण) प्रकल्प आहेत. यातील बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा शून्य टक्के असून, नळगंगा धरणात केवळ ६.६६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. या जिल्ह्यातील मस, कोरडी व तोरणा मध्यम प्रकल्पांची जलपातळी शून्य टक्के आहे. उर्वरित ज्ञानगंगा धरणात ४.६८ टक्के, पलढग ६.९२ टक्के, मन १२.६५ टक्के तर उतावळी धरणात १६.५७ टक्के जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनरेखा बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात केवळ ६.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तेल्हारा तालुक्यातील वान धरणात २५.२६ टक्के जलसाठा आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, उमा शून्य टक्के, घुंगशी बॅरेज शून्य टक्के जलसाठा असून, मोर्णा धरणात आजमितीस ९.६२ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्प असून, सोनल धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. अडाणमध्ये ३.३८ तर एकबुर्जी धरणात ४.८५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.
वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात १०.५५ टक्केच जलसाठा
वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती पाच जिल्ह्यात ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पात २४ जून रोजी १०.५५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.