रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताची शक्यता असून, प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे प्रवाशांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. कवठा बॅरेजमुळे मन नदीपात्रात पाणीसाठा असल्यामुळे मन नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे या ठिकाणी नवीन उंच पूल निर्मितीकरिता बॅरेजच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली होती व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदर निधी वर्गही करण्यात आला; मात्र शेगाव-अकोट हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारात गेल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल निर्मितीतून आपले हात झटकले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पूल निर्मितीकरिता विलंब केल्यामुळे २०१५ ते २०१६ पासून पूल निर्मितीचा मुहूर्तच सापडला नाही.
फोटो:
चार वर्षांपासून पुलाचे काम रखडले.
या पुलाचे काम सुरू झाले होते. नंतर मात्र पुलाचे बांधकाम रखडले. पावसाचे पाणी पुलाखाली साचल्यामुळे जुन्या पुलाचा एक भाग कोसळला. सुदैवाने यात प्राणहानी टळली. या मार्गावरील जड वाहतूक अद्यापही बंदच असून या मार्गावरून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडले असून वाहनांना साईड देताना अपघात घडण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
लोहारा पूल शिकस्त झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मनसगाव मार्गे निंबा फाटा वळविल्यामुळे प्रवाशांना आता शेगाव जाण्याकरिता एसटी प्रवासाकरिता २० रू. ऐवजी ५० रू. मोजावे लागतात आहेत. तसेच तेल्हारा व अकोटकडे जाणाऱ्या प्रवाशांना नियमित भाड्यापेक्षा ५० ते ६० रुपये भाडे मोजावे लागत आहेत.
वाहतूक सुरळीत करा!
लोहारा पूल तीन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा पूल असून धोकादायक बनलेल्या या पुलाची तत्काळ दुरुस्ती करून व कठडे लावून वाहतूक सुरळीत करावी आणि नवीन पुलाची निर्मितीही तत्काळ करावी, अशी मागणी सरपंच प्रवीण मोरे, जनार्दन साबळे, सरपंच विठ्ठल माळी, श्रीकृष्ण मोरखडे, सरपंच रवींद्र नेमाडे, उमेश ऊबाळे, रवींद्र पोहरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.