दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांना मिळताहेत तारखांवर तारखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:52 PM2019-11-23T12:52:43+5:302019-11-23T12:52:50+5:30
दिव्यांगांना डॉक्टरांकडून पुढची तारीख दिली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला.
अकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज केल्यावर दिव्यांगांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येते. दिलेल्या तारखेनुसार वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या दिव्यांगांना डॉक्टरांकडून पुढची तारीख दिली जात असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला.
अकोल्यातील मोहम्मद अली चौकातील पिंजारी गल्ली येथील रहिवासी राशीद अहमद यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी एप्रिल महिन्यात आॅनलाइन अर्ज भरला होता. त्यानंतर तब्बल सात महिन्यांनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शुक्रवार, २२ नोव्हेंबरचा दिवस देण्यात आला होता. त्यानुसार त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात आणले; पण येथे डॉक्टरच उपस्थित नसल्याने त्यांची पंचाईत झाली. काही वेळाने एक डॉक्टर आले व त्यांनी २७ जुलै २०२० ही पुढची तारीख देऊन काढता पाय घेतला. रुग्णाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. याप्रकरणी राशीद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
वैद्यकीय तपासणीसाठी आठ महिन्यांची प्रतीक्षा
मनोविकृती विभागातील डॉक्टरांनी दिव्यांग राशीद अहमद यांची वैद्यकीय तपासणी न करता त्यांना पुढील तपासणीसाठी थेट २७ जुलै २०२० चा दिवस दिला आहे. त्यामुळे राशीद यांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल आठ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बेमुदत उपोषणाचा इशारा
वैद्यकीय तपासणीसाठी गेलेले दिव्यांग राशीद अहमद यांना थेट आठ महिन्यांनी पुढील तपासणीसाठी बोलाविण्यात आल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.