संतोष येलकर,अकोला : खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीनचे हमी दर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून, या शेतमालाची हमी दराने खरेदी करण्यासाठी तालुकानिहाय पीक पेरा आणि पिकांच्या हेक्टरी उत्पादकतेचा अहवाल शासनाच्या पणन विभागामार्फत राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयांकडून मागविण्यात आला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीन इत्यादी शेतमालाची हमी दराने खरेदी करण्यासाठी संबंधित पिकांचा तालुकानिहाय पेरा, पिकांची हेक्टरी उत्पादकता इत्यादी माहितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाच्या पणन विभागामार्फत १३ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांना देण्यात आले. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांमार्फत मूग, उडीद व सोयाबीन पिकांचा तालुकानिहाय पेरा व पिकांची हेक्टरी उत्पादकता यासंबंधीच्या माहितीचा अहवाल शासनाच्या पणन विभागाकडे सादर करण्यात येणार आहे.अहवालानंतर ठरणार हेक्टरी खरेदीचे निकष!मूग, उडीद व सोयाबीन या पिकांचा तालुकानिहाय पेरा आणि पिकांची हेक्टरी उत्पादकता यासंदर्भात माहितीचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांकडून शासनाच्या पणन विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर शेतमालाची हमी दराने हेक्टरी किती खरेदी करावी, यासंबंधीचे निकष शासनाच्या पणन विभागामार्फत ठरविण्यात येणार आहेत.मूग, उडीद, सोयाबीन खरेदीचे असे आहेत हमी दर!यावर्षीच्या खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीन खरेदीचे हमी दर शासनामार्फत जाहीर करण्यात आले. त्यानुसार मूग प्रतिक्विंटल ६ हजार ९७५ रुपये, उडीद प्रतिक्विंटल ५ हजार ६०० रुपये व सोयाबीन प्रतिक्विंटल ३ हजार ३९९ रुपये असे हमी दर आहेत.हमी दराने खरेदीसाठी मूग, उडीद व सोयाबीन पिकांचा तालुकानिहाय पेरा व पिकांची हेक्टरी उत्पादकता, याबाबतची माहिती शासनाच्या पणन विभागामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांकडून मागविण्यात आली आहे.-राजेश तराळे,जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला.