अवैध वीटभट्ट्यांवर कारवाई नाही!
बाळापूर : तालुक्यात १५० पेक्षा जास्त वीटभट्ट्या असताना, काही भट्टी मालकांनी माती वाहतूक परवान्यावर वीटभट्ट्या सुरू केल्या आहेत. उर्वरित वीटभट्टी मालकांनी माती परवाना, पाणी परवाना, व्यवसाय कर, शासकीय जागेचे भाडे न भरता व महसूल प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता, अवैध वीटभट्ट्या सुरू केल्या आहेत. या भट्ट्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
शेत रस्त्याची दुरवस्था, दुरुस्तीची मागणी
कुरूम/माना : कुरूम परिसरातील शेत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, शेतकऱ्यांना शेतातून माल आणण्यासाठी कसरत करावी लागते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर शेतकऱ्यांना शेतातून माल आणताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महावितरणची वसुली थांबविण्याची मागणी
आलेगाव : महावितरण कंपनीचे कर्मचारी आलेगावात दाखल होऊन सक्तीने वीजबिलांची वसुली करीत आहेत. बिल भरले नाही तर वीज खंडित करण्याची धमकी देण्यात येत आहे. शासन वीजबिल माफ करेल, या आशेने अनेकांनी बिलांचा भरणा केला नाही. महावितरणची वसुली थांबविण्याची मागणी होत आहे.
आठ वर्षांपासून शेतामध्ये वीज नाही!
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील अंधार सांगवी येथील शेतकऱ्याने सहा हजार सहाशे रुपये महावितरण कंपनीकडे कोटेशन भरूनसुद्धा आठ वर्षांपासून शेतामध्ये विद्युत कनेक्शन देण्यात आले नाही, अशी तक्रार राजेश सीताराम राठोड यांनी केली.
पिंजर परिसरात वृक्षतोड करून अवैध वाहतूक!
निहिदा : बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर परिसरातून दिवस-रात्र वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैध वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. दिवस-रात्र कत्तल केलेल्या वृक्षांची ट्रकमध्ये भरून अवैध वाहतूक करून ट्रक कारंजाकडे जात आहेत. परंतु वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असून, अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत.
पिंपळडोळी नदीवरील धोकादायक पुलामुळे अपघाताची शक्यता
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पिंपळडोळी येथे गावानजीक निर्गुणा नदीवर असलेल्या पुलाची दुरवस्था झाली असून, पूल धोकादायक बनला आहे. पुलामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या रस्त्यावरून पांढुर्णा गावासह चोंढी धरण, चारमोळी, घोटमाळ, सोनुना, अंधारसांगवीसह परिसरातील नागरिक याच पुलावरून वाहतूक करतात. मात्र, पुलाची दुरवस्था झाली आहे.
खिरपुरी येथील अतिक्रमण काढण्याची मागणी
खिरपुरी बु : येथील खांबदेव महाराज मंदिराजवळ गुरांसाठी पिण्याच्या पाण्याचे हौद आहेत. या हौद परिसरातच काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे गुरांना पाणी पाजण्यासाठी नेताना, अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे केली आहे.
पाणीपट्टी भरण्याचे ग्रामस्थांना आवाहन
आगर : खांबोरा पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याचे बिल थकीत असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामस्थांनी थकीत पाणी कर तातडीने जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन अभियंता चव्हाण यांनी केले आहे.
माकडांचा धुडगूस, ग्रामस्थ त्रस्त
वाडेगाव : वाडेगाव येथे माकडांनी उच्छाद मांडला असून, पाण्याच्या शोधात माकडे गावात येत आहेत. घरांवर उड्या मारून कवेलू फोडत आहेत. छतांचे नुकसान करीत आहेत. माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले. वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
पिंजर येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
पिंजर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक बेफिकीर होऊन वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिक फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाचे प्रयत्नसुद्धा अपुरे पडत असल्याचे चित्र पिंजर गावात दिसत आहे.
आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची मनमानी
बोरगाव मंजू : आरोग्य केंद्रात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी जात असून, येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तपासणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शेळ्या लाभार्थ्यांना मिळाल्याच नाहीत!
बोरगाव वैराळे : पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आलेल्या शेळ्या-मेंढ्या वर्षभरापासून लाभार्थ्यांना मिळाल्या नाहीत. माणिकराव वानखडे यांना २०१९-२० मध्ये शेळी, मेंढ्या गट मंजूर करण्यात आल्या. परंतु अद्यापपर्यंत त्यांना लाभ देण्यात आला नाही.
कोरोनाचा अहवाल लवकर द्यावा
मूर्तिजापूर : कोरोनाच्या अहवालास विलंब न करता पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना पुरावा द्यावा, अशी मागणी मूर्तिजापूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष लखन अरोरा यांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे. मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांय्या अहवालास विलंब होत आहे.