युरिया, डीएपीची मागणी वाढणार; वऱ्हाडात ५.५० लाख मेट्रिक खत उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:00 PM2018-05-15T14:00:14+5:302018-05-15T14:00:14+5:30
अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात युरिया व डीएपी रासायनिक खताची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत या खतांची अधिकची मागणी नोंदविली होती.
अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात युरिया व डीएपी रासायनिक खताची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत या खतांची अधिकची मागणी नोंदविली होती. त्या प्रमाणात ही खते उपलब्ध झाले असून, या खताचा यंदा तुटवडा जाणवणार नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी अमरावती विभागात ३२ लाख ५० हजार हेक्टरवर विविध पिकांचे नियोजन करण्यात आले असून, त्याप्रमाणात लागणाºया ५ लाख ४३ हजार ७१० मेट्रिक टन खतांचेही नियोजन करण्यात आले. यामध्ये सर्वात जास्त १ लाख ८४ हजार ६९० मेट्रिक टन युरिया खताचा समावेश असून, ७९ हजार ८९० मेट्रिक टन डीएपी आहे. तसेच सिंगल सुपर (एसएसपी) फॉस्फेटची वाढलेली मागणी बघता ९१ हजार २१० मे.ट. खते उपलब्ध आहे. यासह एमओपी ३४,८७०, तर १०१ लाख ५३ हजार ५० मे.ट. संयुक्त खतेही उपलब्ध करण्यात आली आहेत.
दरम्यान, यातील बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ६६० मे.ट़ खताचे आवंटन करण्यात आले, तर अकोला जिल्ह्यात ८३ हजार ५२० मे.ट़ , वाशिम ४५ हजार ५१० मे.ट., अमरावती १ लाख ६ हजार २२० मे.ट़ तसेच यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ७० हजार २०० मे.ट़ खते उपलब्ध करण्यात आली आहेत.
खरीप हंगामातील पिकांचे नियोजन व त्यासाठी लागणारे रासायनिक खत याची सांगड घालत खताची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार खते उपलब्ध झाल्याने यावर्षी खताच्या तुटवड्याचा प्रश्नच नाही.
सुभाष नागरे, विभागीय कृषी सह संचालक, अमरावती.