अकोला जिल्ह्यात डेंग्यूचे सात रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 02:30 PM2019-07-19T14:30:24+5:302019-07-19T14:33:15+5:30
काही दिवसांपासून दवाखाने, रुग्णालयांत साथरोगसदृश तापीच्या रुग्णांची गर्दी वाढली असून, यात सात रुग्ण डेंग्यूचे, तर पाच रुग्ण मलेरियाचे आढळून आले आहेत.
अकोला : बदलत्या वातावरणाचा फटका अकोलेकरांना बसायला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून दवाखाने, रुग्णालयांत साथरोगसदृश तापीच्या रुग्णांची गर्दी वाढली असून, यात सात रुग्ण डेंग्यूचे, तर पाच रुग्ण मलेरियाचे आढळून आले आहेत.
जिल्ह्यात साथरोगसदृश तापाची डोकेदुखी वाढली असून, डेंग्यू, चिकुन गुनियाचीही लक्षणे अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. दवाखाने व रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. गत सहा महिन्यांत जिल्ह्यातील आलेगाव, पिंजर, धाबा, महान, पळसो बढे या गावांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे सात, तर उरळ, हातरूण, पंचगव्हाण, पळसो बढे या गावांमध्ये मलेरियाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची ही संख्या कमी असली, तरी धोका टळला नाही. अनेक रुग्णांमध्ये या कीटकजन्य आजारांची लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरात सर्वत्रच डासांसह माशांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साथरोगसदृश आजार डोके वर काढत आहेत. विशेषत: डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ होणे व अतिसार यासारखी लक्षणे दिसून येत आहेत.
तालुकानिहाय रुग्णांची स्थिती
डेंग्यू
तालुका - रुग्ण संख्या
बार्शीटाकळी - ३
पातुर - १
अकोला ता. - १
तेल्हारा - १
अकोला शहर - १
मलेरिया
तालुका - रुग्ण संख्या
बाळापूर - २
तेल्हारा - २
अकोला ता. - १
लहान मुलांना सांभाळा
कीटकांचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे कीटकांपासून लहान मुलांना सांभाळण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
हे करा..
घरासह परिसरात स्वच्छता राखा, घराच्या खिडक्यांना मच्छरविरोधी जाळी लावा, मच्छरदानीचा उपयोग करा, घरात पाणी साठवून ठेवू नका.
कीटकजन्य आजारांची लक्षणे
- अचानक थंडी वाजून ताप येणे
- डोकेदुखी, शरीर बधिर होणे
- पाठदुखीचा त्रास होणे
- भूक न लागणे
साथरोग आणि कीटकजन्य आजारांची लक्षणे दिसताच नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा, आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुविधा उपलब्ध असून, मुबलक औषधसाठाही आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.