अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक करण्यात आले. या योजनेवर भाजप सरकारने आतापर्यंत २२ हजार कोटी रुपये खर्च केले. या योजनेमुळे दुष्काळावर मात करता येईल, असा सरकारचा दावा होता. प्रत्यक्षात मात्र दुष्काळात ही योजना कुचकामी ठरली आहे. संपूर्ण राज्यभर अपयशी ठरली आहे. सरकारचे हे अपयश लपविण्यासाठीच भाजपा सरकारने दुष्काळात टँकर सुरू करण्यासाठी आखडता हात घेतला आहे. मागणी असूनही टँकर सुरू केले जात नाहीत, असा आरोप विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते तथा काँग्रेसच्या विदर्भ दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी केला.दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी प्रत्येक विभागात समिती तयार केली आहे. दुष्काळ पाहणी दौऱ्यास सुरुवात करण्यासाठी मंगळवारी विदर्भाची समिती अकोल्यात आली होती. यावेळी स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवर बोलत होते. माजी मंत्री वसंतराव पुरके, आमदार रणजित कांबळे, वीरेंद्र जगताप, प्रवक्ते अतुल लोंढे, नतिमोद्दीन खतिब, काँग्रेसचे महानगरध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, कार्याध्यक्ष सुनील धाबेकर आदींची उपस्थिती होती.वडेट्टीवर म्हणाले, अकोल्यासह राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे; मात्र त्याअनुषंगाने उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. अकोला जिल्ह्यात केवळ सहा टँकर सुरू आहेत. रोजगार हमी योजनेच्या कामांवरही मजुरांची संख्या कमी आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीबाबत शासन गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. चारा छावणीबाबत मागणी असतानाही प्रशासन छावण्या सुरू करीत नसल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.अकोल्यातील उमरा, वाडेगाव परिसराला भेट दिल्यानंतर समितीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी चर्चा केली व त्यांना अकोल्यातील समस्यांचे निवेदन देऊन उपाययोजना राबविण्याबाबत मागणी केली.यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मदन भरगड, प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते साजिद पठाण, दादाराव मते पाटील, प्रकाश तायडे, बाळासाहेब बोंद्रे, कपिल रावदेव आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)