लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : महाराष्ट्राचा कबड्डी हा खेळ जगविख्यात झाला आहे. या खेळाच्या विश्वचषक स्पर्धा भरत असून, केळीवेळीसारख्या गावात उत्कृष्ट खेळाडू तयार केले जात आहेत. हा खेळ स्पर्धकाच्या कुशलतेवर अवलंबून असून, खेळाडूंनी आपल्यातील दम, कसब दाखवले, तरच संपूर्ण संघाला विजय प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे, प्रत्येक खेळाडूने मैदानावर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले. केळीवेळी येथे आयोजित खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, माजीमंत्री वसंतराव धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जिल्हा मध्यवर्तीचे बॅकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, जगन्नाथ ढोणे, दाळू गुरू जी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ते पुढे म्हणाले, की या गावाला कबड्डीचे आकर्षण असून, अंतिम सामना संपल्यानंतरही प्रेक्षक मैदानावर बसून आहेत. त्यामुळे, ही गर्दी या खेळाच्या यशाचे गमक असून, येथील खेळाडू विश्वचषक स्पर्धेत पोहचावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. केळीवेळीची जमीन खेळाडूंसाठी सुपीक आहे, येथे राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी सामने घेतले जातात ही अत्यंत भूषणावह बाब आहे. या देशी खेळाला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून, आपणही त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. खासदार कबड्डी चषकप्राप्त सर्मथ अमरावती कबड्डी संघ व हरियाणा येथील विजेत्या संघाला त्यांच्या हस्ते खासदार चषक प्रदान करण्यात आला. यावेळी विदर्भासह केळीवेळी पंचक्रोशीतील कबड्डीप्रेमींची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
विजेत्या संघाचा जल्लोष अंतिम सामन्यात विजयी झाल्यांनतर सर्मथ अमरावती पुरू ष व गुरू कुल हरियाणा महिला कबड्डी संघाने एकच जल्लोष केला. यावेळी पंचक्रोशीतील कबड्डीप्रेमींनी त्यांना प्रतिसाद दिला.