धनगर समाजाचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा
By admin | Published: August 12, 2014 12:56 AM2014-08-12T00:56:13+5:302014-08-12T00:56:13+5:30
अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर समाजाचा स्पष्टपणे समावेश असूनदेखील धनगर समाज या सवलतीपासून वंचित आहे.
तेल्हारा : राज्य शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर समाजाचा स्पष्टपणे समावेश असूनदेखील धनगर समाज या सवलतीपासून वंचित आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्वरित धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्या, या मागणीसाठी तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने सोमवार ११ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील महाराजा अग्रसेन टॉवर चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रस्थानी शेळ्या-मेंढय़ा तर अहिल्यादेवी होळकर व मल्हारराव होळकर यांची वेशभूषा धारण केलेले घोडेस्वार होते. सदर वेशभूषा मुक्ताई वसतकार व रमेश मोदे यांनी साकारल्या. पारंपरिक वाद्यासह आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चात नारे व घोषणा करण्यात आल्या. तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देऊन तहसीलसमोर सभा घेण्यात आली. यावेळी या सभेत अनेकांनी आरक्षणाचा मुद्दा मांडला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बळीराम चिकटे, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, तालुकाध्यक्ष नीळकंठ बचे यांनी केले. यावेळी दिनकर नागे, माजी महापौर सुमनताई गावंडे, पुष्पाताई गुलवाडे, पं. स. सभापती लिलाबाई गावंडे, वसंत सोनोने, ढवळे गुरुजी, काशिराम साबळे, ज्ञानेश्वर सुलताने, मीराताई पाचपोर, किसनदादा घोंगे, श्रीकृष्ण जुंबळे, श्रीकृष्ण वैतकार, हरिचंद्र देवळे, डॉ. गजानन नागे, पुरुषोत्तम खोंदेल, साहेबराव पातेंड, गोपाल गावंडे, शाहीर लोणाग्रे, पुंडलीक पाथ्रीकर, गजानन दोड, भारत बरिंगे, हरिदास बरिंगे, भिकाजी नागे, सागर काईंगे, शशिकांत बोरसे, संतोष पाचपोर, सदानंद नवलकार, मंगेश घोंगे, गजानन दिवनाले आदी सहभागी झाले होते. सभेचे संचालन बोरोडे गुरुजी यांनी, तर प्रास्ताविक नीळकंठ बचे यांनी केले. आभारप्रदर्शन श्याम कोल्हे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)