लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुका ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ या कार्यालयाच्या इमारतीची दूरवस्था झाली आहे. इमारतीच्या खिडक्या फुटलेल्या असून, या कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती करावी यासह अन्य समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.तालुका ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात तालुक्यातील पशुपालक आपले गुरेढोरे आणुन त्यांच्यावर उपचार करुन घेतात. परंतु दवाखान्याची इमारतीची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे कर्मचाºयांसह पशुपालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. इमारतीची रंगरंगोटी करणे, विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करणे, दवाखान्यामध्ये जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी हौदाची व्यवस्था करणे, दवाखान्याला प्रवेशद्वार बसविणे आदि प्रश्न निकाली निघालेले नाहीत. यासह भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत तसेच औषधी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी दर्जेदार कपाटही नाही. येथे सोयीसुविधेचा अभाव दिसुन येतो.
दवाखाना इमारतीत मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला. इमारत दुरूस्ती, भौतिक सुविधा आदी समस्या मार्गी लावण्याबाबत पुरेशा प्रमाणात निधी आवश्यक असून यासंदर्भात वरिष्ठ मार्गदर्शन करतील. -एन.व्ही.डेरेपशुधन पर्यवेक्षक