वंचितांची दिवाळी झाली हासरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 03:17 PM2019-10-28T15:17:46+5:302019-10-28T15:17:52+5:30
५ पुरुष, ७ महिला व ३ मुलींना मनपसंत नवीन कपडे व फराळ वितरित करून सहभोजन देऊन आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली.
अकोला: भारतीय संस्कृतीमध्ये सणांचा राजा म्हणून दिवाळी सणाकडे पाहिले जाते. प्रत्येक जण आपापल्या परीने हा सण साजरा करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. उटणे, पणत्या,आकाशकंदील, दिव्यांचा झगमगाट, नवनवीन खाण्याचे पदार्थ, फराळ व मिठाई, नवीन कपडे आदींची रेलचेल असते; परंतु वंचित आणि दुर्बल घटकांसाठी दिवाळी साजरी करणे महादिव्यच असते. या घटकांना कस्तुरीने हात देऊन त्यांची दिवाळी हासरी केली.
आपल्या आजूबाजूला असलेल्या वंचित व दुर्बलांच्या दिवाळीचं काय त्यांच्या अपेक्षा व आनंदाचं काय, मीही समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून शहरातील सेवाभावी संस्था ‘कस्तुरी’ने आधार दिलेल्या वंचितांची ‘दिवाळी’ हा उपक्रम डाबकी रोड येथील श्री संत ज्ञानेश्वर माउलीच्या मंदिरात घेण्यात आला. शहरातील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. नानासाहेब चौधरी यांचा धनतेरस च्या पूर्वसंध्येला वाढदिवस होता. त्याचे औचित्य साधून डॉ. नानासाहेब चौधरी यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून त्यांच्याच हस्ते कस्तुरी परिवारातील ५ पुरुष, ७ महिला व ३ मुलींना मनपसंत नवीन कपडे व फराळ वितरित करून सहभोजन देऊन आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. नानासाहेब चौधरी, देवयानी चौधरी, डॉ. मिलिंद चौधरी, सुश्रुत चौधरी, डॉ. विश्वास व विद्या सापटनेकर (लंडन), प्रभा पांडे, अशोक सकळकळे, कस्तुरीचे संस्थापक प्रा. किशोर बुटोले, उपाध्यक्ष यशवंत देशपांडे, सदस्य संजय ठाकरे, अंकुश गंगाखेडकर, भानुदास देशपांडे आदी उपस्थित होते.