अकोला जिल्ह्यात गरिबांना १ रुपया किलो दराने मका वाटप सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:13 AM2020-09-13T11:13:13+5:302020-09-13T11:13:21+5:30
१ रुपया किलो दराने वाटप करण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबरपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
अकोला: आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेला मका जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय योजनेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना १ रुपया किलो दराने वाटप करण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबरपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत गत १५ जुलैपर्यंत रब्बी हंगामातील मका व ज्वारी खरेदी करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांकडील १९ हजार २५७ क्विंटल मका खरेदी करण्यात आला. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे वाटप सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून १ रुपया किलो दराने शिधापत्रिकाधारकांना मक्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक प्रत्येक लाभार्थीस २ किलो व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक प्रत्येक लाभार्थीस ५ किलो मक्याचे वितरण ११ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना १ रुपया किलो दराने वितरण करण्यात येणार आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात १९ हजार २५७ क्विंटल मका खरेदी करण्यात आला. खरेदी करण्यात आलेला मका जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना १ रुपया किलो दराने वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थीस प्रत्येकी २ किलो व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थीस प्रत्येकी ५ किलोप्रमाणे मक्याचे वितरण करण्यात येत आहे.
-बी.यू.काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी.