अकोला : जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि समस्यांच्या मुद्दयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार, ५ जुलै रोजी आढावा बैठक घेणार आहेत. त्यानुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सूचना जाणून घेतल्या.विधिमंडळाच्या नागपूर येथील पावसाळी अधिवेशनादरम्यान, ५ जुलै रोजी दुपारी १ वाजता अकोला जिल्ह्यातील विकासकामांसंदर्भात विविध समस्यांच्या मुद्दयांवर मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पूर्वतयारीची बैठक घेतली. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध समस्यांसह विकासकामांसंदर्भात उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जाणून घेतल्या, तसेच मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत चर्चा होणाऱ्या जिल्ह्यातील विविध समस्या आणि विकासकामांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या बैठकीला उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेश चौहाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.लोकप्रतिनिधींनी अशा मांडल्या सूचना !आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने कवठा बॅरेजचे काम पूर्ण करणे, बार्शीटाकळी नगर पंचायत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, जिल्हा स्त्री रुग्णालयात खाटांची संख्या ३०० वरून ५०० करणे, बोरगावमंजू ग्रामीण रुग्णालय बांधणे, चोहोट्टा बाजार येथे ग्रामीण रुग्णालय बांधणे, तेल्हारा नगर परिषद पूरक पाणी पुरवठा योजना करणे, अकोल्यात स्पिनिंग हब व टेक्सटाइल पार्क उभारण्याबाबत अहवाल सादर करणे, घुंगशी प्रकल्पातून मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करणे, अकोट तालुक्यातील १३२ गावांसाठी पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव, मोर्णा नदी विकास, अकोला विमानतळ विस्तारीकरणाचा प्रलंबित पश्न मार्गी लावण्यासाठी बैठक लावणे, अकोट येथे शंभर खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, अकोला, तेल्हारा येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे,अकोला व तेल्हारा तहसील कार्यालय इमारतीचे बांधकाम करणे, अकोल्यातील जुने बसस्थानकाची जागा महानगरपालिकेला उपलब्ध करुन देणे यासह इतर मुद्दयांवर लोकप्रतिनिधींनी या बैठकीत सूचना मांडल्या.
‘या’ कामांचा घेतला आढावा !आढावा बैठकीत मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत जिल्ह्यातील कामांची सद्यस्थिती आणि अपूर्ण कामे तसेच कृषी पंपांची वीज जोडणीची प्रलंबित प्रकरणे, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.