अकोला: इतरांप्रमाणेच वंचितांची दिवाळी साजरी व्हावी, या हेतूने गत महिनाभरापासून रद्दी संकलित करत त्यातून मिळालेल्या पैशांतून पुरुषोत्तम शिंदे यांनी स्वराज संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांना फराळ व वस्त्र वितरित करून त्यांची दिवाळी साजरी केली.दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह. हा आनंद प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करीत असतो; मात्र आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्यासाठी अकोल्यातील पुरुषोत्तम शिंदे हे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून गत ११ वर्षांपासून झटत आहेत. दरवर्षी ते दिवाळीच्या महिनाभरापूर्वीच अकोलेकरांना आवाहन करत रद्दी संकलित करतात. यंदाही अकोलेकरांनी त्यांच्या आवाहनाला साथ देत घरातील रद्दी देऊन वंचितांची दिवाळी आनंदी जावी, यासाठी हातभार लावला. यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी गरजवंतांना फराळ व वस्त्र वाटप करून गरिबांना दिवाळीचा आनंद फुलविला. या कार्यात त्यांना हेमंत केतकर, संदीप दाभाडे, शंतनू शिंदे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.या भागात फराळाचे वितरणजठारपेठ भागातील गजानन महाराज मंदिर परिसर, सातव चौक, जिल्हा स्त्री रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय परिसरात गरिबांना फराळ व वस्त्रांचे वितरण केले. यासोबतच इतरही भागात फराळ व वस्त्र वितरित करून गरिबांची दिवाळी साजरी केली.