अकोला: पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला व त्यानंतर वायुसेनेने मिळविलेल्या यशाचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये, या यशाचे राजकारणही करू नये, असे आवाहन करतानाच लष्करी कारवाई व पुलवामा हल्ल्यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर शंका-प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसमोर पुरावे सादर करून त्यांची तोंडे बंद करावी, सत्य समोर आणावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली.अकोल्यातील जाफरी पार्क मैदानावर आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी आ. अबू आझमी शुक्रवारी अकोल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले, की पुलवामा येथील घटना व लष्कराने केलेली यशस्वी कारवाई याचे सत्ताधारी पक्षाकडून होत असलेले राजकारण दुर्दैवी आहे. वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राइकचा अभिमानच आहे; मात्र या कारवाईत जे दहशतवादी मारल्या गेल्याचे सांगण्यात येते, त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत असल्याने सत्य समोर येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. वायुसेनेच्या कारवाईचे श्रेय कोणी घेऊ नये, युद्ध हा उपाय नसून, दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. त्यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सै. मोहिन, प्रदेश उपाध्यक्ष अफझल फारुख, परवेज सिद्धिकी, महिला आघाडी प्रमुख माया चवरे यांच्यासह सपाचे पदाधिकारी बादशाह सेठ, सैयद अली व महेमूद खान उपस्थित होते. समविचारी पक्षांसोबत, अन्यथा स्वबळावर लढणार!भाजपच्या पराभवासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असून, यासाठी काँग्रेसने सहकार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे आवश्यक आहे. अॅड. आंबेडकर यांची कार्यशैली माहीत असल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट करतानाच काँग्रेस आघाडीने जागा न सोडल्यास स्वबळावर ४८ जागांवर लढणार, असेही त्यांनी सांगितले.