भाजीपाला कमी भावात विका, नाही तर जनावरांना खाऊ घाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:22 AM2017-12-15T01:22:16+5:302017-12-15T01:23:47+5:30
अकोट : बोंडअळी, कर्जमाफीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांची अस्वस्थता वाढली आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसताना कमी भावात विका; अन्यथा जनावरांना खाऊ घाला, अशी स्थिती अकोट तालुक्यातील भाजी उत्पादक शेतकर्यांवर ओढवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : बोंडअळी, कर्जमाफीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांची अस्वस्थता वाढली आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसताना कमी भावात विका; अन्यथा जनावरांना खाऊ घाला, अशी स्थिती अकोट तालुक्यातील भाजी उत्पादक शेतकर्यांवर ओढवली आहे.
अकोट तालुक्यात भाजीपाल्याची चांगली आवक झाली आहे; परंतु भाजीपाल्याचा भाव मात्र ठोक बाजारपेठेत गडगडला आहे. त्यामुळे मागणी व पुरवठय़ाच्या असंतुलितपणामुळे सध्या शेतकर्यांना भाजीपाला जनावरांना खाऊ घालावा लागत आहे. कधीकाळी टमाट्यासह भाजीपाल्याचे भाव बाजारात वाढल्याने महागाईचा मोठय़ा प्रमाणात कांगावा करण्यात येत होता; परंतु आता शेतकर्यांना मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या भाजीपाल्याच्या अकोट बाजारपेठेत टमाटे ५ ते १0 रुपये किलो, मेथी ३ रुपये किलो, वांगे ३ रुपये किलो, कोथिंबीर २ ते ५ रुपये किलो, पालक २ रुपये किलो, कोबी १0 ते २0 रुपये कट्टा, निंबू ४ रुपये किलो आदींसह हिरव्यागार भाजीपाल्याचे ठोक भाव चांगलेच घसरले आहेत. भाजीपाल्याला मिळणारे भाव पाहता काढणी व वाहतुकीचा खर्चसुध्दा निघणे कठीण झाले आहे. टमाट्यासह इतर भाजीपाला हा ५ ते ६ दिवसांत वापरावा लागतो. नंतर मात्र नाशवंत होत असल्याने फेकून द्यावा लागत आहे. भाव वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांना भाजीपाल्याची साठवणूक करणे अशक्य आहे. अशा स्थितीत १३ डिसेंबर रोजी अकोट भाजीपाला बाजारपेठमधून जनावरांकरिता भाजीपाला गोरक्षणला पाठविण्यात आला असल्याचे भाजीपाला व्यापार्यांनी सांगितले. भाजीपाल्याचे एकदमच उतरलेले भाव भाजीपाला उत्पादकांच्या आर्थिक संकटात भर टाकणारे ठरत आहेत. उलट ठोक बाजारपेठेत शेतकर्यांना अत्यल्प भाव मिळत असला, तरी चिल्लर विक्रेते मात्र शेतकर्यांनी घामातून पिकविलेल्या भाजीपाला ग्राहकांना अव्वाच्या सव्वा भावात विकत आहेत.
अकोट बाजारपेठेत भाजीपाला भाव २ रुपयांपासून तर १0 रुपयांपर्यंत किलोचा भाव मिळत आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने भाजीपाला जनावरांना चारा म्हणून पाठवावा लागत आहे.
- विनोद अस्वार
अध्यक्ष, भाजीपाला असोसिएशन अकोट