अकोला : जिल्ह्यात सध्या ज्येष्ठ नागरिक व सहव्याधीग्रस्तांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात सुरु असून, मोठ्या संख्येने नागरिक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. कोणतीही लस घेतल्यानंतर साधारपणे २८ दिवस रक्तदान करता येत नाही. लसीकरण मोहिमेचा परिणाम रक्तदानावर होऊ नये, यासाठी इच्छुक रक्तदात्यांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान करून घ्यावे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. मानवी रक्ताला पर्याय नसल्यामुळे अपघातात जखमी झालेले, गंभीर आजार असलेल्यांची रक्ताची गरज भागविण्यासाठी रक्तदान हाच एकमेव पर्याय आहे. गरजुना रक्तपेढ्यांमधून रक्त दिले जाते. तथापि, या रक्तपेढ्यांनाही रक्तदानावरच अवलंबून राहावे लागते. अकोला शहरात १० ते १२ रक्तपेढ्या असून, या रक्तपेढ्या दात्यांकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहेत. रक्तसाठा कायम उपलब्ध राहावा, यासाठी रक्तपेढ्यांना मोठी कसरत करावी लागते. आता कोरोना लसीकरण सुरू असल्यामुळे त्याचा रक्तदानावर परिणाम होऊ नये, यासाठी इच्छुक दात्यांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान करणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. त्यामुळे संबंधित व्यक्तिला साधारणपणे दोन महिने रक्तदान करता येणे शक्य नाही.
दुसरा डोस घेतल्यानंतर करा २८ दिवसांनी रक्तदान
कोणत्याही प्रकारची लस घेतल्यानंतर १४ ते २८ दिवसापर्यंत रक्तदान करू नये, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात. लसीमध्ये अशक्त विषाणू असतात. त्याचा परिणाम रक्त घेणाऱ्यावर होण्याची शक्यता असते. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनी २८ दिवस रक्तदान करू नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोना लसीचे दोन डोस असून, पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यामुळे साधारणपणे दोन महिने रक्तदान करता येत नाही.
कोरोनाची धास्ती असल्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. साधारणपणे दररोज ४ ते ५ रक्तदाते येतात. कोरोनामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास मर्यादा येत असल्याने इच्छुक रक्तदात्यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे.
डॉ. अजय जुनघरे, रक्तपेढी प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
आमच्या रक्तपेढीतून प्रामुख्याने थॅलेसिमियाग्रस्तांची गरज भागविली जाते. कुठलेही व्हॅक्सिन घेतल्यानंतर साधारणपणे २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे इच्छूक रक्तदात्यांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान करण्याचे नियोजन केले तर रक्तपेढीतील रक्त उपलब्धतेवर त्याचा परिणाम होणार नाही.
नीलेश जोशी, सचिव, हेडगेवार रक्तपेढी, अकोला