अकोलेकरांनो घाबरू नका....कोरोना रुग्णांसाठी २६०० पेक्षा अधिक खाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:53 AM2020-09-10T11:53:25+5:302020-09-10T11:53:42+5:30

सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये तब्बल २६६९ खाटांची व्यवस्था असल्याची माहिती समोर आली आहे.

Don't be afraid, Akolekars .... More than 2600 beds for Corona patients! | अकोलेकरांनो घाबरू नका....कोरोना रुग्णांसाठी २६०० पेक्षा अधिक खाटा!

अकोलेकरांनो घाबरू नका....कोरोना रुग्णांसाठी २६०० पेक्षा अधिक खाटा!

googlenewsNext

- अतुल जयस्वाल
अकोला : जिल्ह्यात कोरोना अनियंत्रित झाला असून, या संसर्गजन्य आजाराचा विळखा घट्ट होत आहे. अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा प्रथमच हजाराचा टप्पा पार करत ११२४ वर पोहोचला असून, कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पृष्ठभूमीवर आरोग्य सज्जतेचा आढावा घेतला असता, सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये तब्बल २६६९ खाटांची व्यवस्था असल्याची माहिती समोर आली आहे.
‘अनलॉक-४’ अंतर्गत लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असून, अनेक क्षेत्र खुली झाली आहेत. आंतरजिल्हा बससेवाही सुुरू झाली असून, नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारपेठा व रस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. यामुळे संपर्कातून संसर्ग वाढला असून, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज शंभराच्या घरात रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी प्रथमच अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हजाराच्यावर गेला. जिल्ह्यात आतापर्यंत ४९२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, सध्या ११२४ रुग्ण विविध ठिकाणी भरती आहेत. वाढत्या रुग्णसंख्येचा ताण एकट्या सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील रुग्णही येत आहेत. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांसाठी व्यवस्था केली असून, जिल्ह्यात सर्वोपचार रुग्णालय, दोन खासगी रुग्णालये, १७ कोविड केअर सेंटर्स व सात कोविड समर्पित आरोग्य केंद्रांमध्ये २६६९ खाटा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

आणखी १५० खाटा वाढणार
कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आणखी १५० खाटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला शहरातील राधाकिशन तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालय येथे १०० खाटांचे कोविड केअर सेंटर होणार असून, येत्या आठवडाभरात उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून हे सेंटर रुग्णसेवेत येणार आहे. याशिवाय मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय येथेही आणखी ५० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.

आॅक्सिजन सुविधेच्या ३५० खाटा
गंभीर रुग्णांची निकड लक्षात घेता जिल्ह्यात सात कोविड समर्पित आरोग्य केंद्रांमध्ये ३५० खाटा आॅक्सिजन सुविधेसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Don't be afraid, Akolekars .... More than 2600 beds for Corona patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.