लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, रक्तसंकलनावर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी मार्च ते मे या तीन महिन्यात रक्तसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने अनेक गंभीर रुग्णांना ऐनवेळी रक्त मिळणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत रक्तदात्यांनी न घाबरता गरजूंचे प्राण वाचविण्याची गरज आहे, असे आवाहन राज्य रक्तसंक्रमण परिषद व शासकीय रक्तपेढीतर्फे जागतिक रक्तदान दिनानिमित्त करण्यात आले.दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये शाळा- महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे तसेच नियमित रक्तदाते बाहेरगावी गेल्यामुळे रक्ताचा राज्यात तुटवडा भासतो. असे असले तरी रक्ताची मागणी मात्र कायम असते. त्यात भर म्हणजे यंदा सर्वत्र कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने शिबिरांच्या आयोजनावर मर्यादा आल्या आहेत; मात्र सुरक्षा व स्वच्छतेचे पालन करून तसेच रक्तदानाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थित नियमन करून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने सूचना जारी केलेल्या आहेत. तथापि, रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्याविषयी भीती अथवा संभ्रम निर्माण झालेला आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये व गर्दी करू नये हे खरे असले तरी रक्तदान हे गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.रक्तदान केल्यामुळे अथवा रक्त संक्रमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्व सामाजिक, धार्मिक संस्थांनी रक्तदात्यांसाठी पुढे यावे. शिबिरे आयोजित करून गरजू रुग्णांसाठी रक्त संकलन करावे. इच्छुक रक्तदात्यांनी नजीकच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने एका पत्राद्वारे केले आहे.
५ हजार रुग्णांना रक्ताची गरजपरिषदेच्या माहितीनुसार राज्यभरात दर दिवशी सुमारे ४,५०० ते ५ हजार गंभीर रुग्णांना रक्ताची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी, अपघातग्रस्तांसाठी व थॅलेसिमिया, हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराने ग्रस्त रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते. अकोला शहरात येणाऱ्या अशा रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे.
अकोल्यात शस्त्रक्रिया आणि अपघातग्रस्त रुग्णांसह रक्तासंबंधित आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. या रुग्णांना रक्ताची गरज भासते. त्यामुळे गरजू रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करण्यासाठी ग्रामीण स्तरावर रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी रक्तदात्यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.- डॉ. श्रीराम चोपडे,रक्तपेढी प्रमुख, जीएमसी, अकोलाराज्यात दिवसाला