अकोला : रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात अनेक मुले भिक मागतात. त्या मुलांना भिक देणे म्हणजे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे मत शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करणाºया सेव्ह बचपन चळवळीचे राज्य पदाधिकारी विनोद राठोड यांनी व्यक्त केले आहे. अकोला जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याकरिता सेव्ह बचपनच्यावतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता राठोड अकोल्यात आले होते.
तुमच्या जिल्हा परिषद शाळेत काय बदल घडविले? - मी अमरावती जिल्ह्यातील सालनापूर येथील जिल्हा परिषद शाळेत लक्षवेधी परसबाग विकसित केली आहे. या बागेत २१० प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. संपूर्ण पिक सेंद्रिय पद्धतीने घेतल्या जाते. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातील सहा दिवसांकरिता सहा वेगळे गणवेश देण्यात आले आहेत. यासोबतच दर्जेदार शिक्षण देण्यावर आमचा प्रमुख भर असतो. युनेस्कोने आमच्या शाळेची दखल घेतली आहे.
तुम्ही शाळाबाह्य मुलांना शिक्षण देण्याकरिता काय प्रयत्न केले? - आम्ही आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्याकरिता आदिवासी भाग, विविध समाजाचे तांडे, पाडे, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात जाऊन पालकांना भेटून त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. त्यानंतर मुलांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला.
सेव्ह बचपन चळवळ वाढविण्याकरिता काय प्रयत्न करीत आहात?- सेव्ह बचपन ही प्रामाणिक आणि निरंतर काम करणारी चळवळ आहे. या चळवळीत राज्यभरात अनेक शिक्षकांचा सहभाग आहे. मात्र, शिक्षकांसोबत यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढावा, हा आमचा उद्देश आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येतो. मात्र, त्यांना मुलांना शिक्षण मिळत नाही. काही दिवस शाळेत गेल्यानंतर मुले नियमित शाळेत जात नाहीत. त्यांना चांगले शिक्षण मिळण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची आपली जबाबदारी समजून कार्य करायला हवे.
त्याकरिता सामान्य माणसाने काय करायला हवे?- सामान्य माणसाला कार्यालयात जाताना, बाजारात खरेदीसाठी जाताना भिक मागताना मुले दिसली किंवा कचरा - प्लॅस्टीक पन्नी वेचताना मुले दिसली तर त्यांच्याशी बोलून ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या शाळेत प्रवेश द्यायला हवा. या मुलांना शाळेत प्रवेश देण्याकरिता कोणतीही अडचण येत नाही.
हे कार्य करताना तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? - अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ते राहत असलेल्या परिसरात किंवा गावात जावून त्यांना शाळा शिकण्याची विनंती केल्यावर त्यांच्या पालकांच्या रागाचा सामना करावा लागला. एकदा तर मुलांच्या पालकांनी मला चाकू दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दारू काढणाºया भागात जावूनही आम्ही मुलांच्या पालकांना समजावून शाळेत सहभागी करून घेतले आहे.