अकोला : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आतापर्यंत लसीकरणादरम्यान कोविशिल्डचा डोस दिल्या जात होता. मात्र, आजपासून चार केंद्रावर कोव्हॅक्सीनचा डोस दिला जाणार आहे.
६० वर्षावरील व्यक्ती, ४५ वर्षावरील व्यक्ती लाभार्थी (ज्यांना दुर्धर आजार आहे) अशा व्यक्तींचे लसीकरण केल्या जाणार आहे. शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय, तोष्णीवाल आयुर्वेद रुग्णालय स्टेशन रोड, तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालय जठारपेठ रोड, नागरी आरोग्य केंद्र कृषिनगर या चार केंद्रावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान हा डोस दिल्या जाणार आहे. नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून कोव्हॅक्सीनवर क्लिक करा, त्यानंतर ओटीपी येईल. ओटीपी टाकून सेंटर व वेळ निवडावे लागणार आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदाच कोव्हॅक्सीनचा डोस दिला जाईल. ज्यांनी आधी कोविशिल्डचा डोस घेतला आहे, अशांनी दुसरा डोसही कोविशिल्डचाच घ्यावा.
राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक